मुंबई - देशात अनेक विषय आहेत. परंतु ज्या विषयावर चर्चा व्हायला पाहिजे, त्यावर चर्चा केली जात नाही. देशातील आणखीन एक महत्त्वाचा विषय म्हणजे हिंदुत्वाचा आहे. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदूंवर हल्ले केले जाताहेत. त्यांना मारलं जातंय. हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड केली जातेय. बांगलादेश क्रिकेट संघ भारतात आला होता. तेव्हा आदित्यने त्याला विरोध केला होता, पण तिकडे कोणी लक्ष दिलं नाही. आता मात्र बांगलादेशात हिंदूंवर अन्याय होतोय. हल्ले केले जाताहेत. इस्कॉन मंदिराची तोडफोड केली जातेय. परंतु यावर भाजपाचे कोणी बोलत नाही. जे विश्वगुरू आहेत ज्यांनी एका फोनवर युक्रेनचे युद्ध थांबवले होते. आता पंतप्रधान मोदी बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांवर शांत कसे? ते काहीच बोलत नाहीत, त्यांनी यावर भूमिका घेतली पाहिजे. पण ते का बोलत नाहीत? असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय. आज त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
भाजपाचं हिंदुत्व फक्त मतांसाठी : पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हे आम्हाला तुमचे कसले हिंदुत्व म्हणून टीका करतात. पण आता बांगलादेशात हिंदूंवर हल्ले होतात. यावर केंद्र सरकार कुठली भूमिका घेत नाही. त्यामुळे यांची नेमकी हिंदुत्वाची व्याख्या तरी काय आहे? हे सांगावे. भाजपाला फक्त हिंदू हे केवळ मतांसाठी दिसतात का? "वन नेशन वन इलेक्शन" म्हणतात ते केवळ मतांसाठी आणि निवडणुकापुरतेच आहे का? ज्या हिंदूंनी तुम्हाला मतदान केलंय आणि निवडून दिलंय, त्यांच्यावर आता हल्ले होतात. ते तुम्ही थांबवण्यासाठी कोणती भूमिका घेणार आहात आणि काय करणार? असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी भाजपावर केलाय. बटेंगे तो कटेंगेचा नारा भारतात दिला. पण आता जिथे गरज आहे, तिथे ते बोलत नाही. बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांवर भाजपाने आणि मोदींनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलीय.
भाजपाची हिंदुत्वाची व्याख्या काय? : सध्या भाजपाचा डोळा हा हिंदूंच्या मंदिरावरती आहे. दादरमध्ये ज्या हमालांनी आपल्या कष्टाने 80 वर्षांपूर्वी हनुमान मंदिर बांधले होते. ते मंदिर पाडण्यासाठी भाजपाने नोटीस पाठवलीय. ती नोटीस माझ्याकडे आहे. इस्कॉन मंदिरावर हल्ले होताहेत. ते तोडलं जातंय. जिथे मंदिर बांधलं जाणार आहे, त्या भूखंडावर सिडकोचा डोळा आहे. मग भाजपाच्या राजवटीत हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड होणार असेल तर यांच्या हिंदुत्वाची नेमकी व्याख्या तरी काय आहे? ते त्यांनी स्पष्ट करावे. मग आम्हाला म्हणतात की, तुमचे हिंदुत्व हे नकली आहे. तुम्ही हिंदूंची मतंही केवळ निवडणुकीपुरती आणि मतांसाठीच घेतली का? जे भाजपा हिंदूंची मंदिरं सुरक्षित ठेवू शकत नाही, त्यांनी आम्हाला हिंदुत्वाची भाषा शिकवू नये, अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपावर केलीय.
ईव्हीएममुळे त्यांचा विजय : विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात वातावरण होते आणि त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय होईल, असं बोललं जात होतं. मात्र निवडणुकीत महायुतीचा विजय झाला आणि ते जिंकून आले, पण लोकांच्या मनात या निकालाविषयी शंका आहे. ईव्हीएमच्या आधारे महायुती जिंकलीय. हे आता सर्वांना माहीत पडले आहे. ईव्हीएमच्या विरोधात मोठी आंदोलनं होताहेत. मोर्चे निघतात. लोकांच्या मनात यांच्या विजयाबद्दल शंका आहे हे सर्वांना माहीत आहे. पण ज्या हिंदूंची मते घेतली त्याच हिंदूंवर अत्याचार होतोय. अन्याय होतोय, हल्ले होताहेत, त्यासाठी ते कोणती भूमिका घेणार? हे त्यांनी स्पष्ट करावे. याबाबत काल आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत वेळ मागितली होती. पण त्यांनी आम्हाला वेळ दिली नाही. आमची वेळ नाकारली. म्हणून मी आज तुमच्यासमोर पत्रकार परिषद घेत आहे, जर काल भेट दिली असती तर आम्ही हिंदूंवर होणारा अत्याचार त्यांच्यासमोर मांडला असता. त्यामुळे आता त्यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारासंदर्भात त्यांची काय भूमिका आहे? हल्ले थांबवणार आहेत की नाही? हे त्यांनी स्पष्ट करण्याची वेळ आलीय, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.
हेही वाचा-