पुणे Shashikant Pedwal News : राज्यात तीन टप्प्यांचं मतदान संपलं असून 13 मे रोजी चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. 20 मे रोजी शेवटच्या पाचव्या टप्प्यातील 13 जागांसाठी मतदान होणार आहे. मात्र, गेल्या तीन टप्प्यात राज्यातील विविध मतदारसंघात काही प्रमाणात कमी मतदान झाले. या कमी झालेल्या मतदानाची कारणं विविध आहेत. तरी चौथ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी तीन दिवस सलग सुट्टी असल्यानं अनेक नागरिक बाहेर जाण्याचा प्लॅन करण्याची शक्यता आहे. अशातच ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासारखे दिसणारे पुण्यातील शशिकांत पेडवाल हे अमिताभ बच्चन यांच्या शैलीत मतदारांना मतदानासाठी आवाहन करत आहे.
पुणे निवडणूक अधिकारी यांच्याकडून शशिकांत पेडवाल यांची मतदान जनजागृतीसाठी ब्रँड अँबेसिडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पेडवाल हे सोशल मीडिया तसंच नागरिकांच्या घरोघरी जाऊन मतदान करण्यासाठी जनजागृती करत आहे.
काय म्हणाले पेडवाल? : यासंदर्भात ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने शशिकांत पेडवाल यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, "देशाची निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावं. यासाठी सुरुवातीला मी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती केली. यानंतर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून माझी फ्रेंड अँबेसिडर म्हणून निवड झाली. आज मी सोशल मीडिया तसंच प्रत्यक्ष नागरिकांमध्ये जाऊन मतदान करण्याबाबत जनजागृती करत आहे. शासनाच्या माध्यमातून मतदान जनजागृती संदर्भात अनेक उपक्रम राबवले जात आहेत. तरी देशाचा नागरिक म्हणून माझेही काही कर्तव्य आहेत. त्यामुळं मी महानायक अमिताभ बच्चन यांच्या शैलीत मतदारांना मतदानासाठी आवाहन करतोय.
प्रथमच मतदान करणाऱ्यांवर लक्ष- पुढं ते म्हणाले की, "मला असं वाटतं की मी आत्तापर्यंत केलेल्या जनजागृतीचा दहा टक्के तरी फरक जाणवणार आहे. कारण, नागरिकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. मात्र, सलग तीन दिवस सुट्टी येत असल्यानं अनेकजण फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहे. त्यामुळं त्यांना मी मतदानाचं महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्न करतोय. तसंच माझं लक्ष तरुणवर्ग तसंच प्रथमच मतदान करणाऱ्यांवर आहे. त्यांना मी मतदान करण्याचं आवाहन करत आहे," यावेळी पेडवाल यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- लोकसभा निवडणूक 2024 : शांतिगिरी महाराज आणि छगन भुजबळ यांच्यात बंद दाराआड चर्चा, चर्चेला उधाण - Lok Sabha Election 2024
- लोकसभा निवडणूक 2024 ; पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नंदुरबारमध्ये, उद्धव ठाकरेंवर काय करणार पलटवार, याकडं नागरिकांचं लक्ष - Lok Sabha Election 2024
- लोकसभा निवडणुकीचा प्रचार विकासावरून जाती-धर्मावर घसरला - Lok Sabha Election 2024