भिवंडी Bhiwandi Crime : बाजारात अनेक प्रकारच्या बनावट वस्तू विकल्या जात असल्याचं आपण ऐकलं, पाहिलं आहे. परंतू आता बाजारात चक्क बनावट मसाले विकले जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन नामवंत कंपन्यांच्या बनावट मसाल्याची बाजारात विक्री करणाऱ्या दुकलीचा शांतीनगर पोलिसांनी पर्दाफाश करीत बेड्या ठोकल्या आहेत. महेश लालताप्रसाद यादव (वय ४२),मोहमद सलमान मोहमद अफजल प्रधान (वय ४१ दोघे रा.जोगेश्वरी,पश्चिम मुंबई) अशी अटक केलेल्या मसाला तस्करांची नावं आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बदलापूर पश्चिम येथे राहणारे भिवंडी शहरातील एव्हरेस्ट कंपनीचे सेल्समन सचिन काशीनाथ पासलकर यांना टेम्पो क्र.एम एच ०३ सीडी ०६७९ मधून एव्हरेस्ट आणि मॅगी मसाल्याचा बनावट माल विक्रीसाठी शांतीनगर मधील जब्बार कंपाऊंड येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुषंगाने त्यांनी शांतीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीच्या आधारे,१७ मे रोजी पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (प्रशासन) विनोद पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अतुल अडुरकर, पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे, पोलीस हवालदार संतोष पवार, पोलीस नाईक श्रीकांत पाटील, किरण जाधव, पोलीस शिपाई नरसिंह क्षीरसागर, रोशन जाधव, रवींद्र पाटील आणि तौफिक शिकलगार या पथकानं सापळा रचून आरोपींना ताब्यात घेत अटक केली. त्यावेळी आरोपींनी १ लाख रुपयांचा मॅगी व एव्हरेस्ट कंपनीचा बनावट मसाला विक्रीसाठी आणून ग्राहकांची आणि मसाला कंपन्यांची फसवणूक केल्याचे उघड झालं.
४ लाखांचा माल जप्त : पोलीस चौकशीदरम्यान, आरोपी मोहम्मदने सांगितलं की, बनावट मसाला गुजरात राज्यातील सुरत येथील एका फॅक्टरीमधून खरेदी करण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी गुजरातमध्ये तपास केला. त्यावेळी सदर मसाला सुरेशभाई मेवाडा (२२ रा.सुरत) ह्याने एव्हरेस्ट व मॅगी कंपनीच्या परवानगी शिवाय तयार केला असून सुरत मधील पर्वतगाव येथील गाळा क्र.१२८ मध्ये पॅकिंग मशिनद्वारे बनावट मसाल्याचा साठा करून ठेवल्याचे समोर आलं. सदर गाळा तपासाच्या दृष्टीने सीलबंद केला गेला. मसाला तस्करांकडून टेम्पोसह बनावट मॅगी व एव्हरेस्ट कंपनीचा मसाला असा एकूण ४ लाख ८ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास शांतीनगर पोलिस करीत आहेत.
हेही वाचा