बुलढाणा Bhendwal Ghatmandani 2024 : सुप्रसिद्ध भेंडवळच्या घटमांडणीचं भाकीत आज सकाळी जाहीर करण्यात आलं आहे. शेतात खड्डा, खड्ड्यात मातीचा घट, घटात पाणी आणि त्यावर कुरडया, त्याच्या बाजूला पान सुपारी आणि पाणी पाऊस, पीक परिस्थिती, राजकीय स्थिती तसेच आर्थिक संकटे याबाबत ठोकताळे हे घटमांडणीचं पारंपरिक चित्र आहे. त्यामुळे सामान्य जनतेतही आणि राजकीय लोकांनाही या मांडणीची प्रचंड उत्सुकता असते. आज जाहीर करण्यात आलेल्या भाकितातून पिकं चांगली असणार आहेत. मात्र अतिवृष्टी होणार असल्यानं पिकाला अतिवृष्टीचा फटका बसणार असल्याचं वर्तवण्यात आलं आहे. 'पानविळा कायम असल्यानं राजा कायम राहील,' असा 'सूचक' अंदाज वर्तवण्यात आला. मात्र निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यानं कोणतंही थेट राजकीय भाकीत यावेळी जाहीर करण्यात आलं नाही.
भेंडवळ घटमांडणीची साडेतीनशे वर्षाची परंपरा : जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ या गावी घटमांडणीची परंपरा सुमारे साडे तीनशे वर्षांपासून सुरू आहे. भेंडवळची घटमांडणी 10 मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या संध्याकाळी केली जाते. मांडणीचं भाकीत 11 मे रोजी पहाटे चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज जाहीर करतात. घटमांडणी नेहमी प्रमाणं शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केली जाते. शेतकरी मोठ्या उत्साहानं या घटमांडणीचं भाकीत ऐकण्यासाठी उपस्थित असतात. घटांमध्ये झालेल्या बदलानुसार भाकितं वर्तवण्यात येतात.
काय असते घटमांडणीत : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी शेजारच्या शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात येते. घटामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर, करडी इत्यादी अठरा प्रकारची धान्य ठेवण्यात येतात. घटाच्या मध्यभागी मातीची ढेकळं त्यावर पाण्यानं भरलेली घागर ठेवतात. पानसुपारी, पुरी, पापड, सांडोळी- कुरडई हे खाद्यपदार्थ ठेवले जातात. रात्रभर त्या ठिकाणी कोणीही थांबत नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे या घटांमध्ये झालेल्या बदलाचं निरीक्षण केलं जाते. या 'घटमांडणी'तून वर्षभराचा हंगाम, पीक, पाऊस अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था आणि राजकीय घडामोडींचा अंदाज वर्तवला जातो. त्यानंतर भाकीत वर्तवण्यात येते.
भेंडवळची भविष्यवाणी जाहीर : बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ परिसरातील शेतकरी दावा करतात की, 350 वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला ही प्रथा जोपासली जाते. या प्रथेला शेतकऱ्यांची मोठी मान्यता असते. या मांडणीतून जाहीर केलेल्या अंदाजाबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. राज्यातील शेतकऱ्यांचा या प्रथेवर मोठा विश्वास असतो. सकाळी सूर्योदयाच्या वेळी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी या घट मांडणीचं निरीक्षण करुन यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष या घटमांडणीकडं लागून असते.
शेतकऱ्यांना बसणार अवकाळीचा फटका : भेंडवळच्या घटमांडणीचं भाकीत वर्तवण्यात आलं, यात शेतकऱ्यांसाठी यंदा पहिल्या महिन्यामध्ये पाऊस कमी असणार आहे. दुसऱ्या महिन्यामध्ये साधारण तर तिसऱ्या महिन्यामध्ये प्रचंड पाऊस असणार आहे. चौथ्या महिन्यामध्ये चांगला पाऊस असणार आहे. अतिवृष्टीचं भाकीतही यावेळी वर्तवण्यात आलं आहे. चौथ्या महिन्यामध्ये अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे, असे प्रमुख अंदाज शेतकऱ्यांना काहीसे सुखावणारे आणि सावध करणारेही आहेत.
हेही वाचा :
- Bhendwal Bhavishyavani 2023: भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीत जाहीर ; 'अशी' आहे या वर्षीची भेंडवळची भविष्यवाणी
- अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर सोने महाग की स्वस्त? वाचा, प्रमुख महानगरांमधील मौल्यवान धातुंचे दर - Gold price today
- अक्षय्य तृतीयेला करा 'या' गोष्टींचं दान, होईल विशेष फलप्राप्ती! - Akshaya Tritiya 2024