मुंबई : Bharat Jodo Nyaya Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात नंदुरबारमध्ये दाखल झाले आहेत. तर, दुसरीकडे नंदुरबारचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्माकर वळवी हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा आहेत. त्यांनी नुकतीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. या सर्व पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी हे काँग्रेस बचाव नाहीतर काँग्रेस डुबवणारे नेते असल्याची टीका त्यांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते.
'काँग्रेस नेते पक्ष सोडतील' : राहुल गांधी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात. तसंच, राहुल गांधीनी वारंवार ओबीसींचाही अपमान केला आहे असंही बावनकुळे म्हणाले आहेत. त्यामुळे ओबीसी समाज त्यांच्यावर नाराज आहे. राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा करत आहेत. या सर्व प्रवासात त्यांना गिफ्ट काय मिळणार आहे. तर, काँग्रेसचे मोठे नेते पक्ष सोडणार आहेत. राहुल गांधी यांची यात्रा जशी जशी मुंबईतील शिवाजी पार्क जवळ येईल तसतसे काँग्रेस नेते पक्ष सोडतील असा खळबळजनक दावाही बावनकुळेंनी केला आहे. काँग्रेस कमजोर झाली आहे असा हल्लाबोलही बावनकुळे यांनी केला आहे.
'आमच्याकडे लिस्ट आली आहे' : बावनकुळे पुढे म्हणाले की, राहुल गांधी आज नंदुरबारमध्ये आले आहेत. तर, नंदुरबारचे नेते मला भेटायला आले. 5 टर्म आमदार असलेले पद्माकर वळवी हे मला भेटायला येतात. याचा अर्थ तुम्हांला समजला असेल. पद्माकर वळवी हे मोठे नेते आहेत, त्यांनी माझी भेट घेतली आहे. आमच्याकडे मोठी लिस्ट आली आहे. राहुल गांधी हे काँग्रेस डुबवणारे नेते आहेत. ते काहीतरी बोलायचं म्हणून बोलत असतात. त्यांच्या बोलण्याला काहीच अर्थ नसून, काँग्रेस नेहमी संभ्रमाच राजकारण करत आलंय असा आरोपही बावनकुळे यांनी केला आहे.
'80 टक्के जागा वाटपाचा तिढा संपला' : लोकसभा जागा वाटपात भाजप सोबत असलेल्या मित्र पक्षांवर अन्याय होत आहे अशा चर्चा सुरू आहेत, यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की मित्र पक्षांवर कुठलाही अन्याय होणार नाही. तसंच, मित्र पक्षावर अन्याय होईल अशी कुठलीही गोष्ट भाजपा कदापी करणार नाही. जागा वाटपावर आमच्यात कोणताही तिढा नाहीये असा दावाही त्यांनी केला आहे. 80 टक्के जागा वाटपाचा तिढा संपला असून, लवकरच संपलेला पाहायला मिळेल असंही ते म्हणाले आहे.
हेही वाचा :
1 Lok Sabha Election : काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर