मुंबई - अभिनेत्री प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजपा आमदार सुरेश धस यांच्यावर कारवाईची मागणी केली. यावेळी प्राजक्ता माळीनं आमदार सुरेश धस यांच्या विरोधात तक्रार केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिलं आहे.
सरकारकडून न्याय मिळेल- अभिनेत्री प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जवळपास 15 ते 20 मिनिटे चर्चा केली. आपली कशी बदनामी करण्यात आली याबाबत तिने सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच महिला कलाकारांची बदनामी केली जात असल्याचं सांगितलं. प्रसारमाध्यमदेखील चुकीच्या बातम्या चालवतात. याविषयी एखादा कायदा करण्यात यावा, अशी मागणी यावेळी प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती समोर येत आहे. महायुती सरकारकडून महिलांचा आदरच राखला जाईल. कुणाच्याही प्रतिमेला बाधा पोचणार नाही किंवा कुणाचीही बदनामी होणार नाही. तुमच्यावर अन्याय होणार नाही. तुम्हाला सरकारकडून न्याय मिळेल. या राज्यात महिलांचा नक्कीच आदरखच राखला जाईल. जे काही चुकीचे आहे त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीला दिल्याची माहिती समोर येत आहे.
आमदार धस यांच्याविरोधात कशामुळे तक्रार?बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी निषेधार्थ शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. तर या प्रकरणावरून भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना 'बीडमध्ये कोणते इव्हेंट चालतात...' असं म्हणत अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे धनंजय मुंडेसोबत नाव जोडण्याचा अप्रत्यक्षरीत्या प्रयत्न केला. सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर शनिवारी प्राजक्ता माळीनं पत्रकार परिषद घेत धस यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली होती. यावेळी प्राजक्ता माळीनं सुरेश धस यांच्या वक्तव्याची मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, असे आवाहन करत कारवाईची मागणी केली होती. तसेच आपण लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत, असेही प्राजक्ता माळीनं म्हटले होते. यानंतर रविवारी तिने मुख्यमंत्र्यांना भेटण्याची वेळ मागितली होती. मुख्यमंत्र्यांकडून प्राजक्तला भेटण्यासाठी वेळ देण्यात आली होती.
महिला आयोगाकडून धस विरोधातील तक्रारीची दखल- आमदार सुरेश धस यांच्याविरोधात प्राजक्ता माळीनं राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. सुरेश धस यांच्या वक्तव्याची चौकशी करण्यात येणार आहे. जर काही चुकीचं असेल तर त्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल, असे राज्य महिला आयोगाच अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटलं. राज्यात महिलांचा आदर हा राखला गेलाच पाहिजे, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी म्हटलं आहे. आमदार सुरेश धस यांनी कोणतेही वेगळं बोलणं नसल्यानं माफी मागणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
प्राजक्ता माळीला मराठी कलाकारांकडून पाठिंबा- प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर तिला पाठिंबा देणाऱ्यामध्ये वाढ होत आहे. हास्यजत्रा मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी, अभिनेत्री विशाखा सुभेदार, नृत्यांगना गौतमी पाटील यांनी प्राजक्ता माळीला पाठिंबा दिला आहे. "आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, असं या कलाकारांनी म्हटलं आहे. प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री आता आपल्याच पक्षाचे आमदार असलेल्या सुरेश धस यांच्यावर कोणती कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
हेही वाचा-