चांदूर बाजार (अमरावती) Bee Attack : मधमाशांच्या हल्ल्यात दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. कमलाकर आसोलकर (50) आणि नयन ऊके (25) असे मधमाशांच्या हल्ल्यात प्रकृती चिंताजनक असलेल्यांची नावे आहेत.
सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले: मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यामुळे वीज वितरण कार्यालयात बिल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांसह परिसरातील विद्यार्थी गंभीर जखमी झालेत. या घटनेतील सर्व जखमींना सुरुवातीला चांदूरबाजार येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र या सर्वांचीच प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आलं.
मधमाशांच्या हल्ल्यात अपंग व्यक्ती बेशुद्ध: चांदूरबाजार येथील पाणीपुरवठा कार्यालय परिसरात कमलाकर आसोलकर हे लकवाग्रस्त व्यक्ती पाण्याचे बिल भरण्यासाठी आले होते. या ठिकाणी असणाऱ्या पाण्याच्या टाकीवरील मधमाशांच्या पोळ्यातून अचानक मधमाशा उडू लागल्या. कमलाकर आसोलकर हे मधमाशांनी वेढले गेले. मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केल्यामुळे ते जखमी होऊन बेशुद्ध पडले.
दोनवेळा मधमाशांनी केला हल्ला- अग्निशमन दलाच्या जवानांनी कमलाकर आसोलकर यांच्यावर पाण्याचा फवारा मारला. त्यामुळे मधमाशा त्यांच्यापासून दूर झाल्या. मात्र पाण्याची फवारणी थांबवताच पुन्हा मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. मधमाशांच्या गराड्यातून कमलाकर असोलकर यांना कसेबसे बाहेर काढून रुग्णवाहिकेतून त्यांना चांदूरबाजार येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना तात्काळ अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. यानंतर त्यांना तात्काळ अमरावतीत उपचारासाठी आणण्यात आले. मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या इतर सर्वांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले.
शाळांच्या दारं खिडक्या केल्या बंद: पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालय परिसरातच आर आर काबरा विद्यालय आहे. या ठिकाणी बारावीची परीक्षा सुरू असतानाच ही घटना घडली. मधमाशा परीक्षा केंद्रात शिरू नये, यासाठी शाळेच्या सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद करण्यात आले होते. या घटनेमुळे चांदूरबाजार शहरात खळबळ उडाली.
हेही वाचा: