सोलापूर Vitthal Temple Area Of Pandharpur : पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सध्या अंतिम टप्प्यात सुरू आहे. हे काम सुरू असतानाच मंदिराच्या हनुमान गेट जवळ फरशीचं काम करत असताना जमिनीखाली पोकळी असल्याचं आढळून आलं आहे. या तळघरात अंधार असल्यानं स्पष्ट असं काही दिसत नव्हतं; मात्र खोली पाच ते सहा फूट खोल आहे. या खोलीत मूर्ती सदृश्य वस्तू दिसते.
मुस्लिम आक्रमणापासून बचाव करण्यासाठी 'हा' प्रयत्न : मंदिराची पूर्वापार पूजाअर्चा करणारे बडवे आणि उत्पात, पुजारी मंडळी यांचेकडून अधिक माहिती घेतली जात आहे. मुस्लिम आक्रमणापासून बचाव करण्यासाठी श्री विठ्ठल-रखुमाईची मूर्ती सुरक्षित स्थळी हलविली जात होती का? त्यासाठीचे हे तळघर आहे का? अशी शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान या तळघराविषयी उलट-सुलट चर्चा पंढरपूर पंचक्रोशीत सुरू आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला पुरातन रूप देण्यासाठी तीन टप्प्यात काम करण्यात येत आहे. येथील पहिल्या टप्प्याच्या कामाला 15 मार्चपासून सुरुवात झालेली आहे. याकरता श्री विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन हे बंद करण्यात आलं होतं. सकाळी 6 ते 11 या वेळेतच मंदिरात मुखदर्शन सुरू ठेवण्यात आलं होतं.
ते तळघर की भुयार? : गुरुवारी सायंकाळी सात वाजता मंदिरातील हनुमान दरवाजा येथील दगडी फरशीचे आणि भिंतीच्या दगडांचे फ्लोरिंग करण्याचे काम सुरू होते. दगडी फरशीचे फ्लोरिंग करत असतानाच एक दगड खाली दबला गेला आणि त्या ठिकाणी पोकळी निर्माण झाली. तेव्हा तो दगड बाजूला करण्यात आला तेव्हा त्या दगडाच्या खाली पोकळी दिसून आली. या तळघरात मूर्ती सदृश्य वस्तू असल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं आहे. मात्र एकच दगड काढून पाहणी करण्यात आली आहे. त्यामुळे हे तळघर आहे की भुयार आहे याबाबत नेमकी माहिती समजू शकली नाही.
यासाठी तयार केला असावा भुयारी मार्ग : आज शुक्रवारी सायंकाळी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनाथ महाराज औसेकर, वास्तु विशारद तेजस्विनी आफळे, पुरातन तत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, महाराज मंडळी आणि तज्ञ यांच्या उपस्थितीमध्ये आज सायंकाळी या भुयारी खोलीची पाहणी केली जाणार आहे. सध्या या तळघराबाबत पंढरपूर आणि पंचक्रोशीमध्ये उलट-सुलट चर्चा असून विठ्ठल मंदिरातून गोपाळपूर येथील जनाबाईच्या मंदिरापर्यंत भुयारी मार्ग असल्याचंही बोललं जात आहे. श्री विठ्ठलास जनाबाईच्या भेटीला जाता यावं म्हणून भुयारी मार्ग असल्याचीही चर्चा सुरू आहे. नेमके या तळघरांमध्ये काय आहे? तळघर आहे की भुयारी मार्ग आहे याबाबत मंदिर समिती इतर विभाग हे तज्ञांचे उपस्थितीत आज सायंकाळी पाहणी करणार आहेत. त्यानंतरच नेमकी अधिक माहिती समोर येणार असल्याचं कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
हेही वाचा :
- राज्यातील 48 मतदारसंघांत कोण मारणार बाजी? तुमच्या भागाचा कोण खासदार? जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट - Lok Sabha Election 2024
- म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; अर्ज करण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ - Pune Mhada Lottery
- कल्याणीनगर अपघात प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी जे काही खरं आहे ते सांगावं - सुप्रिया सुळे - Pune hit and run case