पुणे Sharad Pawar Meeting: खासदार सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातून यावेळेस आपण जिंकून येणार, असा विश्वास भाजपाचा आहे. त्यासाठी भाजपाकडून जोरदार तयारी सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या बंडानंतर बारामती लोकसभेचं गणित बिघडलेलं आहेत. खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेचा असलेला बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्याकरिता आता स्वतः शरद पवार यांनी कंबर कसली आहे.
'या' ठिकाणी होणार बैठका: बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विधानसभा निहाय बैठका शरद पवार घेणार आहेत. त्यात पक्षाची सध्याची स्थिती, विधानसभामध्ये काय तयारी करावी लागणार, याची चाचणी शरद पवार स्वतः घेत आहेत. खासदार सुप्रिया सुळे पवार यांच्यासाठीच आता शरद पवार मैदानात उतरले आहेत. कोणत्या स्थितीत बारामती लोकसभा मतदारसंघाचा विजय खेचून आणण्याचा प्रयत्न शरद पवार गट करत आहेत. त्यासाठी सर्वच तयारी सुरू करण्यात येत आहे. उद्यापासून बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड, इंदापूर आणि पुरंदर या ठिकाणी या बैठका होणार आहेत.
असा आहे बैठकींचा क्रम: शरद पवार सलग चार दिवस विधानसभा मतदारसंघातील बैठक घेणार आहेत. पहिल्या दिवशी 15 फेब्रुवारीला बारामतीत आढावा बैठक आहे. दुसऱ्या दिवशी 16 फेब्रुवारीला दौंड मतदारसंघाची बैठक घेणार आहेत. 17 फेब्रुवारीला इंदापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. 18 फेब्रुवारीला पुरंदरला जाहीर सभा होणार आहे. 19 फेब्रुवारीला ते पुण्यात शिवजयंतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.
ननंद विरुद्ध भावजय असा संघर्ष रंगणार: दोनच दिवसांपूर्वी बारामती लोकसभेविषयी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "काही लोक भावनिक आवाहन करतील की, मी ठरवेल त्या उमेदवाराला मतदान करा.'' त्यानंतर शरद पवारांनी "मी निवडणूक लढवणार नाही तर भावनिक कसं करणार", असं म्हटलं होतं. त्याचबरोबर दोन दिवसांपूर्वी बारामतीमध्ये सुमित्रा पवार यांच्या बॅनरवर काळ फासण्यात आलं होतं. बारामती लोकसभा मतदारसंघात ननंद विरुद्ध भावजय असा संघर्ष रंगणार असल्याचं बोललं जात आहे. शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे याच उमेदवार आहेत. तर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना संधी दिली जाऊ शकते. बारामती लोकसभा मतदार संघात मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यासाठीच आता शरद पवार स्वतः मैदानात उतरले आहेत.
बहिण भावामध्ये राजकीय वितुष्ट: अजित पवार हे शरद पवार गटापासून वेगळे झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात राजकीय वितुष्ट निर्माण झाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना खासदार पदावरून खाली खेचण्यासाठी भाजपा आणि अजित पवार गट जबरदस्त मोर्चेबांधणी करत आहे. याला तोंड देण्यासाठी खुद्द शरद पवार उतारवयात बैठकींच्या मैदानात उतरले आहेत. तरी विजयी पताका कोण फडकवणार हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल.
हेही वाचा: