छत्रपती संभाजीनगर : बाजारात अनेकदा दूषित पाण्यानं भाजीपाला धुतला जातो. असे अनेक व्हिडिओही समोर आलेत, ज्यामधे पालेभाज्या दूषित पाण्यात टाकून त्या भाज्या बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्या जातात. दरम्यान, रस्त्यावर साचलेलं पाणी फळांवर टाकलं जात असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ शहरातील टीव्ही सेंटर परिसरातील असून मनसेतर्फे या फळ विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. याबाबत मनसेचे मध्यवर्ती विधानसभा अध्यक्ष चंदू नवपुते यांनी सिडको पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
नेमकं प्रकरण काय? : मंगळवारी दुपारी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये टीव्ही सेंटर परिसरातील एक फळ विक्रेता रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बोंदरं म्हणजेच पोतं भिजवत होता. त्याचवेळी एका नागरिकानं ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. विक्रेत्यानं आपल्या हातगाडीवरील केळी त्या पाण्यात भिजवलेल्या पोत्यानं झाकून ठेवली. त्यानंतर आणखी एक पोतं रस्त्यावर साचलेल्या पाण्यात भिजवलं आणि ते देखील त्यानं केळींवर टाकलं. तिथं असलेल्या नागरिकानं दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावर पाण्याचा वॉल आहे. त्याठिकाणी पाण्याची गळती होते आणि रस्त्यावर पाणी साचतं. त्याठिकाणी साचलेल्या पाण्यात भिजवलेलं पोते फळ विक्रेत्यानं केळीवर टाकलं.
मनसेकडून कारवाईची मागणी : ही घटना मंगळवारी सकाळी घडली. त्यानंतर अवघ्या काही वेळातच या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर मनसेच्या वतीनं त्याचा जाहीर निषेध करण्यात आला. याप्रकरणी मनसेचे मध्यवर्ती विधानसभा अध्यक्ष चंदू नवपुते यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सध्या नवरात्र सण सुरू आहे, नवरात्रीनिमित्त अनेक भाविक उपवास करतात आणि त्यानिमित्तानं फळं खरेदी करतात. या घटनेची तातडीनं चौकशी करून संबंधित फळ विक्रेत्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चंदू नवपुते यांनी केली आहे.
नागरिकांचं आरोग्य धोक्यात : नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. तसंच त्या ठिकाणी स्वच्छतेचे कोणतेही नियम पाळत नसल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा