मुंबई - विधानसभा निवडणुकीचे 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर याचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. निवडणुकीला जवळपास एक महिन्याचा कालावधी शिल्लक असताना अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम आहे. विदर्भातील 12 जागांवरून ठाकरे गटाने ताठर भूमिका घेतलीय. तर कोणत्याही परिस्थितीत ह्या जागा सोडायच्या नसल्याचं काँग्रेसने ठरवलंय. दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून मंगळवारी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्ह ओक येथे भेट घेतली. आमच्या कुठलाही बेबनाव नाही, जागावाटपाचा तिढा लवकरच सुटेल, असंही यावेळी बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. भेटीनंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
भाजपाने चुकीच्या बातम्या पेरल्या : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, मी शरद पवारांची भेट घेतली. आमच्या दोघात चांगली चर्चा झाली. दुपारी तीन वाजता पुन्हा महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत जागा वाटपावर चर्चा होईल. दरम्यान, आमच्यामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होण्यासाठी भाजपाने बातम्या पेरल्या, असा आरोप थोरात यांनी भाजपावर केला. महाविकास आघाडीत कोणतेही बेबनाव नाही. आम्ही एकत्रच निवडणूक लढवणार आहोत. शरद पवार यांच्यासोबत माझी सकारात्मक चर्चा झाली. महाविकास आघाडीत किंवा शिवसेना (ठाकरे गटात) कोणतेही मतभेद नसल्याचं यावेळी थोरातांनी सांगितले. मात्र विरोधक आणि मुख्यत: भाजपा आमच्याविरोधात चुकीच्या बातम्या पसरवून गोंधळाची परिस्थिती निर्माण करीत असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी भाजपावर केली.
उद्धव ठाकरेंची भेट घेणार: विदर्भातील 12 जागांवरून महाविकास आघाडीमध्ये अजून तिढा सुटला नाही. या 12 जागांची ठाकरे गटाने मागणी केलीय. तर इथे ठाकरे गटाचे वर्चस्व आणि जनमत नाही, या विदर्भातील 12 जागा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, त्यामुळं या जागा आम्हालाच मिळाल्या पाहिजेत, अशी भूमिका काँग्रेसची आहे. एकीकडे भाजपाने पहिली 99 जणांची यादी जाहीर केलीय. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीत अजून जागांचा तिढा सुटत नाही. महाविकास आघाडीतील यादी जाहीर नसल्यामुळं महाविकास आघाडीत मतभेद आहेत का? असा प्रश्न थोरात यांना विचारला असता, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, सर्व काही आलबेल आहे आणि ज्या काही मोजक्या जागांचा तिढा सुटला नाही, त्याबाबत मी आता मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी चाललो आहे. त्यांच्याशी चर्चा करणार आणि त्यानंतर दुपारी महाविकास आघाडीची बैठक होईल. या बैठकीतून जागा वाटपाचा तिढा सुटेल आणि लवकरच महाविकास आघाडीची यादी जाहीर होईल, असेही थोरात यांनी सांगितले.
हेही वाचा-