ठाणे Buffalo Attack In Bhiwandi : कुर्बानीसाठी आणलेल्या म्हशीचा अचानकपणे ताबा सुटल्यानंतर या म्हशीनं रहदारीच्या रस्त्यावर हैदोस घातला. परिसरातील एका महिलेसह चार जणांना गंभीर जखमी केल्याची घटना भिवंडीतील समरू बाग परिसरात घडली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. याप्रकरणी म्हशीच्या मालकावर भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तारिक फारुकी असं म्हशीच्या मालकाचं नाव आहे.
नेमकं काय घडलं? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीतील ताहीर कंपाऊंड येथे राहणाऱ्या तारिक फारुकी यांनी बकरी ईदला कुर्बानीसाठी एक म्हैस खरेदी केली. या म्हशीला 12 जूनला सायंकाळच्या सुमारास त्यांनी घरासमोर मोकळं सोडलं होतं. तेव्हा अचानक म्हशीचा ताबा सुटला. ती म्हैस सैरावैरा पळायला लागली. यावेळी म्हशीच्या धडकेत एका महिलेसह 4 जण गंभीर जखमी झाले. यामध्ये म्हशीनं एका तरुणाच्या कमरेत शिंग भोकसल्यानं त्याचे आतडे बाहेर आले. त्यानंतर तरुणारा तात्काळ इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्याची प्रकृती खालावल्यानं त्यास मुंबईतील सायन रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तर इतर जखमींनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
म्हशीच्या मालकावर गुन्हा दाखल : याप्रकरणी जखमी महिला मुबशारा शकील अहमद अन्सारी (वय 20) यांच्या तक्रारीवरून म्हैस मालक तारिक फारुकी विरुद्ध भादंविच्या कलम 289, 337, 338 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेल्या वर्षीही भिवंडी तहसीलदार कार्यालयात अशाच प्रकारे बकरी ईदच्या काळात रेड्यानं नागरिकांची सळो की पळो अवस्था केली होती. त्यामुळं शहरात या घटनेची पुनरावृत्ती नाकारता येत नाही. संबंधित प्रशासनानं अशा घटना रोखण्यासाठी उपाय योजना करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
हेही वाचा -