पुणे Baba Siddique : मिलिंद देवरांपाठोपाठ माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत आणखी एक झटका दिला आहे. बाबा सिद्दीकी उद्या (10 फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली.
काल काँग्रेसचा राजीनामा दिला : अजित पवार म्हणाले की, "बाबा सिद्दीकी 10 फेब्रुवारीला संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. तर 11 फेब्रुवारीला आणखी काही लोक पक्षात प्रवेश करणार आहेत." बाबा सिद्दीकी यांनी गुरुवारी पक्षाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. गेल्या महिन्यात मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेता मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी बाबा सिद्दीकी देखील काँग्रेस पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा होत्या. काँग्रेसमधून बाहेर पडताना, पक्षात आपली कोंडी केली जात असल्याचा आरोप बाबा सिद्दीकींनी केला होता. यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी सध्या मुंबईतून काँग्रेसचे आमदार आहेत.
बाबा सिद्दीकी यांना राज्यसभेची लॉटरी? : अजित पवार यांचं नेतृत्व स्वीकारत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर बाबा सिद्दीकी यांना पक्षातर्फे राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. किंबहुना राज्यसभेतल्या खासदारकीच्या बोलीवरच बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आपली आमदारकीची जागा मुलगा, झिशान सिद्दीकीसाठी सोडल्यानंतर बाबा सिद्दीकी यांच्याकडे विधिमंडळ किंवा संसदेतलं कोणतंही पद नाही. त्यामुळे राज्यसभेत प्रवेश झाल्यानंतर त्यांचं राजकीय पुनर्वसन होईल. शिवाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेसुद्धा राष्ट्रीय राजकारणात प्रतिनिधीत्व करु शकेल असा प्रभावी मुस्लिम चेहरा नाही. बाबा सिद्दीकी यांना राज्यसभा खासदारकी मिळवून दिल्यानंतर ही कमतरताही पूर्ण होईल, अशी एकंदर योजना असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे.
48 वर्ष काँग्रेसमध्ये होते : बाबा सिद्दीकी यांनी 48 वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं. त्यांच्या राजकारणाची सुरुवात विद्यार्थीदशेपासून झाली. ते 1992 आणि 1997 च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले. तर 2000 ते 2004 या काळात ते म्हाडाच्या मुंबई बोर्डाचे अध्यक्ष होते. बाबा सिद्दिकी मुंबईच्या वांद्रे पश्चिम मतदार संघातून 1999, 2004 आणि 2009 असे सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. तसेच त्यांनी राज्यात अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री आणि कामगार राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे.
हे वाचलंत का? :