मुंबई : Salopur Lok Sabha constituency : लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता देशभरात लागू झाली आहे. भाजपा नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची गृहमंत्री पदावरून तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी (Londe complaint Against Fadanvis) अशा प्रकारची मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केलीय.
'फडणवीस यांच्याकडून मतदारांची दिशाभूल' : राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला पाठवलेल्या तक्रारीत अतुल लोंढे यांनी म्हटले, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आयोजित एका बैठकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार राम सातपुते यांनी गृहमंत्री फडणवीस यांना फोन करत एका समाजाच्या काही व्यक्तींवर कोविड कालावधीत दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठी विनंती केली. यावर गृहमंत्री फडणवीस यांनी गुन्हे मागे घेण्याबाबत आश्वासन देऊन चिंता करू नका असं बोललं असल्याचा व्हिडिओ समोर येत आहे. बैठकीला उपस्थित असलेल्या एका समाजाच्या बांधवांना आश्वासित करून अशा पद्धतीनं प्रलोभन देणं, आश्वासन देणं हा आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप लोंढे यांनी केला आहे. खरंतर गुन्हे मागे घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. राज्य सरकारकडून समितीनं शिफारस केल्याशिवाय गुन्हे मागे घेणं अशक्य आहे. तरीदेखील मतदारांना प्रलोभन, आश्वासन देऊन फडणवीस यांच्याकडून मतदारांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप लोंढे यांनी केला आहे.
'राम सातपुते यांची उमेदवारी रद्द करावी' : अतुल लोंढे यांनी या व्हायरल व्हिडिओ संदर्भात गृहमंत्री यांना प्रश्न विचारले आहेत. सदर समाजातील व्यक्तींवरील गुन्हे मागे का घेतले नाहीत? निवडणुकीच्या काळात या गुन्ह्यांची आठवण कशी झाली? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. गुन्हे मागे घेण्यासाठी निवडणुकीची वाट पाहात होता काय? असाही थेट सवाल अतुल लोंढे यांनी फडणवीस यांना विचारला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा गैरवापर केला आहे. त्यांना गृहमंत्री पदावरून तत्काळ दूर करावं. तसंच, सोलापूरचे भाजपा उमेदवार राम सातपुते यांची उमेदवारी रद्द करावी, अशी तक्रार काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली असल्याचं अतुल लोंढे म्हणाले आहेत.
हेही वाचा :