मुंबई - नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचा मंगळवारी दुसरा दिवस आहे. आज सकाळी विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारच्या विरोधात आंदोलक करत घोषणाबाजी केली. तर तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल. यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही कॅबिनेटमंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिली. भाजपाचे विधान परिषदेतील गटनेते प्रविण दरेकर यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत, चौकशी मागणी केली होती.
...म्हणून गोवण्याचा प्रयत्न - महाविकास आघाडी सरकारच्या काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात गोवण्यासाठी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दबाव टाकला होता. तत्कालीन पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्यावर ही जबाबदारी होती. असा जबाब संजय पुनामिया यांनी दिला आहे. या संदर्भातील व्हिडिओ क्लीप प्रसारमाध्यमांद्वारे व्हायरल केली. विधान परिषदेत याचे पडसाद उमटले. प्रवीण दरेकर यांनी ही क्लीप परिषदेचे तालिका सभापती निरंजन डावखरे यांना सादर केली. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असताना सरकारला धारेवरत धरत, तसंच महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्टाचार काढल्याने सूड भावनेतून फडणवीस यांना खोट्या गु्न्ह्यात गोवण्याचा प्रयत्न झाला होता. हे प्रकरण गंभीर असून या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी. पोलीस उपायुक्त पाटील यांना तातडीने निलंबित करावे, सरकारी वकील शेखर जगताप यांना पॅनलवरून काढून टाकावे. माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली. तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी याची दखल घेत, यावर सरकारला उत्तर देण्याची सूचना केली.
दोषींवर कारवाई होणार - विधान परिषदेतील गटनेते प्रविण दरेकर यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत, या प्रकरणाच्या सखोल चौकशी मागणी केल्यानंतर याला कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी सरकारच्या वतीने उत्तर दिलं. हे प्रकरण सरकारनं गांभीर्यानं घेतलं असून पोलीस अधिकारी ऑडियो क्लिप प्रकरणात आणि शिंदे-फडणवीस यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या प्रकरणात ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षेखाली एसआयटी चौकशी केली जाईल, असं आश्वासन दिलं. याशिवाय गरज भासल्यास माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचीही चौकशी करण्यात येईल. यात पांडे थोडेजरी दोषी आढळून आले तर, त्यांच्यावर अधिवेशन संपण्यापूर्वी कडक कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन यावेळी कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं.