पुणे- अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसून चोरानं चाकूनं हल्ला केला असून, यात सैफ जखमी झालाय. ही घटना काल मध्यरात्रीनंतर घडलीय. आता यावर विविध राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्यात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिलीय. त्यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, महाराष्ट्रात मुंबईतच नव्हे तर पुणे आणि बीड जिल्ह्यातही हल्ले होताना दिसत आहेत. गृहमंत्र्यांचं हे अपयश आहे. गृहमंत्र्यांनी जरा यात बारकाईने लक्ष घालण्याची गरज आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांनीदेखील याकडे लक्ष घातलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काम केलं पाहिजे, असं यावेळी बजरंग सोनवणे म्हणालेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणेंनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
परळी शांत ठेवण्याची जबाबदारी तेथील लोकप्रतिनिधींची : बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की, काल वाल्मिक कराड याला 7 दिवसांची कोठडी मिळालीय. न्यायालयाने काय विचारावं, काय विचारू नये हा त्यांचा प्रश्न आहे. तपास यंत्रणा त्यांचं काम करीत आहे, असंही यावेळी सोनवणे म्हणालेत. तसेच परळी अजूनही शांत झालेली नाही, याबाबत सोनवणे यांना विचारलं असता ते म्हणाले की, परळी शांत ठेवण्याची जबाबदारी तेथील लोकप्रतिनिधींची आहे. बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून मी लोकांना आवाहन करेन की, सर्वांनी शांतता ठेवली पाहिजे. जे लोक आहेत, ते जनतेमधील नसून हे त्यांचे साथीदार करीत असल्याचं यावेळी सोनवणेंनी सांगितलंय.
वाल्मिक कराडला बेड्या का ठोकल्या नाहीत : मंत्री पंकजा मुंडे यांनी परळी बंदबाबत केलेल्या विधानावर सोनवणे यांना विचारलं असता ते म्हणाले की, हो खरं आहे, पंकजा मुंडे 5 वर्षं कामापासून बाजूला होत्या. परंतु बीडमधील मला काही माहीत नाही, अशी उत्तरं पंकजा मुंडे यांच्याकडून अपेक्षित नाहीत. लहान मुलाला पण कळत की कुठे काय सुरू आहे, असं म्हणत सोनवणे यांनी मुंडे यांच्यावर टीका केलीय. वाल्मिक कराड याच्याबाबत सोनवणे यांना विचारलं असता ते म्हणाले की, वाल्मिक कराड याच्याकडे सापडलेल्या मोबाईलबाबत मी काही बोलत नाही. सगळ्यांना बेड्या ठोकल्या, पण वाल्मिक कराडला बेड्या का ठोकल्या नाहीत, याचा प्रश्न मी पोलिसांना विचारणार आहे. त्याला व्हीआयपी ट्रिटमेंट का मिळत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.
100 कोटींहून अधिकची मालमत्ता असल्यास ईडीनं चौकशी करावी : वाल्मिक कराडवर ईडी कारवाई झाली पाहिजे. अवैध मालमत्तेसंदर्भात सगळ्यांना जो कायदा आहे, त्यानुसार कारवाई झाली पाहिजे. सगळीकडे संपत्ती सापडतेय, 100 कोटींच्या पुढे मालमत्ता असेल तर ईडीकडून नियमांनुसार चौकशी करण्यात यावी, असं यावेळी सोनवणे म्हणाले. बारामतीत शरद पवार आणि अजित पवार आज एकत्र येणार आहेत. याबाबत सोनवणे यांना विचारलं असता ते म्हणाले की, पवार सगळे एकत्र आहेत. ते कुटुंब आहे. राजकीयदृष्ट्या एकत्र यावं की नाही याबाबत मी सांगत नाही. पवार साहेबांची जी इच्छा असेल तिचं माझी इच्छा आहे, असंही यावेळी सोनवणे म्हणाले.
हेही वाचा :