मुंबई Shrigonda Constituency Election - सध्या महाविकास आघाडीत आगामी विधानसभा निवडणुकांच्या जागा वाटप करून बैठकींचे सत्र सुरू आहे. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? याबाबत शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्यात चर्चा सुरू आहेत. मात्र, शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील परस्पर उमेदवार जाहीर केले जात असल्याचा आरोप होत आहे.
नुकतेच श्रीगोंदा येथे शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी 'श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचा पुढचा आमदार हा ठाकरेंच्या शिवसेनेचा असेल' असं वक्तव्य केलं होतं. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणावर आता संजय राऊत यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आम्ही तिघेही आपापल्या प्रमुख कार्यकर्त्यांना एक संदेश देत असतो की आपण तयारी करा. श्रीगोंदाच्या बाबतीत काय घडतंय माहित नाही. पण श्रीगोंदा हा काही हॉट विषय नाही. श्रीगोंद्यात महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकेल, हे मला माहिती आहे-खासदार संजय राऊत
शरद पवार यांच्याकडे चुकीची माहिती- संजय राऊत यांनी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघावर दावा केल्यानं शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. 'अद्याप जागावाटप झालेलं नाही. कोणीही परस्पर उमेदवारी घोषित करू नये' असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. तर, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनीदेखील नाराजी व्यक्त केली होती. यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "शरद पवार यांच्याकडे चुकीची माहिती आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या उमेदवारांना काम करण्यासाठी एक संदेश देत असतो. मीदेखील तेच केलं. आमची 288 मतदारसंघात तयारी आहे."
आमच्यामध्ये कसलेही मतभेद नाहीत- पुढे बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, "कोणीही कुठेही उमेदवारी जाहीर केलेली नाही. सर्व मतदारसंघांमध्ये आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, संभाव्य उमेदवारांना तयारीला लागा हा संदेश दिला आहे. त्यात काय चुकतंय असं वाटत नाही. कामाला लागा. तयारीला लागा, असे संदेश शरद पवार जयंत पाटील नाना पटोले यांनीही दिलेले आहेत. त्याच्यात एवढं आक्षेप घ्यायचं कारण नाही. कोणीही कुठेही कधीही कोणत्याही पक्षाने अशा प्रकारचे दावे केलेले नाहीत. हे मी ठामपणे सांगू शकतो. कारण, मी त्या प्रक्रियेत आहे. आम्ही तिघेही मिळून निर्णय घेतो. आमच्यामध्ये कसलेही मतभेद नाहीत," अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
हेही वाचा-