मुंबई BJP Vs Shivsena War : ''आमच्यामुळं तुमचा पक्ष वाढला, आमच्यामुळं तुमची सत्ता आली आणि आमच्यामुळंच तुम्हाला मुंबई आणि महाराष्ट्र दिसला'', अशी टीका शिवसेनेकडून (ठाकरे गट) भाजपावर केली जात आहे. शिवसेना नसती तर महाराष्ट्रात भाजपाला कोणीही ओळखलं नसतं. म्हणून आमच्यामुळं (शिवसेना) भाजपाला मुंबई, महाराष्ट्र दिसला असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावर भाजपाकडूनही 'जशाच तसं' उत्तर मिळालं आहे. ''आमच्यामुळं तुम्हाला दिल्ली दिसली'', असं भाजपा नेते आशिष शेलार यांनी म्हटलंय. त्यामुळं राज्यात 'आमची-तुमची'चं राजकारण वाढत आहे.
भाजपाला आमच्यामुळं मुंबई-महाराष्ट्र दिसला : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर खासदार संजय राऊत हे खूपच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत. ते सत्ताधाऱ्यांवर दररोज टीका करताहेत. दरम्यान, आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्योराप होत असताना संजय राऊत यांनी एका वेगळ्याच कारणावरून भाजपाला लक्ष्य केलंय. ''शिवसेना नसती तर भाजपाला महाराष्ट्र दिसलाच नसता. महाराष्ट्रात भाजपा वाढण्यास आणि मोठी होण्यास शिवसेनेचा मोठा हात आहे. तसंच शिवसेनेमुळं मुंबईत आणि महाराष्ट्रात भाजपानं हातपाय पसरले. त्यामुळं भाजपानं जास्त फडफड करू नये'', अशी बोचरी टीका संजय राऊतांनी केलीय.
तुम्हाला दिल्ली आमच्यामुळं दिसली : दुसरीकडे संजय राऊतांच्या वक्तव्याचा आशिष शेलारांनी खरपूस समाचार घेतला आहे. ''दररोज सकाळी त्यांचा (संजय राऊतांचा) भोंगा वाजत असतो; परंतु त्यांना कोणी आता गांभीर्यानं घेत नाही. संजय राऊत म्हणतात की, मुंबई आणि महाराष्ट्र भाजपाला हा शिवसेनेमुळं दिसला. पण, ते अज्ञानी आहेत. जेव्हा मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता नव्हती त्यावेळी तिथं भाजपाचा नगरसेवक होता. जेव्हा शिवसेनेनं विधानसभा निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांच्याकडे निवडणूक चिन्ह नव्हतं. त्यावेळी शिवसेनेच्या एका आमदारानं भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती; परंतु हे संजय राऊतांचा अभ्यास कमी असल्यामुळं त्यांना माहीत नाही. तसेच शिवसेना वाढवण्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा हात मोठा आहे; पण या बांडगुळांना भाजपामुळं दिल्ली दिसली'', असा प्रतिहल्ला आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर केला.
कंगनाचं ऑफीस सूडापोटी तोडलं ? : महाविकास आघाडी सरकारच्या काळात अभिनेत्री कंगना राणावत हिच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई करण्यात आली होती. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती. अभिनेत्री कंगना राणावत हिने उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. म्हणून सूड भावनेनं कंगनाचं ऑफिस तोडण्यात आलं होतं. कुरघोडीचं आणि सूडाचं राजकारण उद्धव ठाकरेंनी केलं, अशी त्यावेळी विरोधकांनी टीका केली होती; मात्र ह्या कारवाईचं अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर हिनं समर्थन करताना ''जर अनधिकृत बांधकाम पालिकेनं तोडलं तर त्यात गैर काय?'' असं म्हटलं होतं. त्यावेळी ऊर्मिला मातोंडकर आणि कंगना राणावत यांच्यात ट्विटरवॉर देखील झालं होतं.
कंगना तुमची तर ऊर्मिला आमची : यावेळी भाजपाकडून कंगनाचं समर्थन करत तिला पाठिंबा देण्यात आला होता. तर ऊर्मिला मातोंडकर हिला शिवसेनेनं पाठिंबा दिला होता. त्यामुळं तेव्हाही 'ते तुमचे तर हे आमचे' असा वाद शिवसेना-भाजपात पाहायला मिळाला होता. तेव्हा 'ऊर्मिला तुमची तर कंगना आमची' असं वक्तव्य भाजपातील नेत्यांनी केलं होतं. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचं काहीजण समर्थन करत होते. त्यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी समर्थन करणाऱ्यांना इशारा देत, त्यांच्यावर जोरदार प्रहार केला होता. तेव्हा त्यांनी एक नारा दिला होता की, ''जर दाऊद तुमचा तर अरुण गवळी आमचा'', असं बाळासाहेबांनी म्हटलं होतं. यानंतर आता पुन्हा एकदा 'आमचे-तुमचे'चं राजकारण होताना दिसतय.
हेही वाचा: