अमरावती Govind Fruit Ekadashi : आषाढी एकादशीच्या पर्वावर 'गोविंद फळा'ला अतिशय महत्त्व आहे. जंगलातील वेलीवर वर्षातून एकदाच येणारं गोविंद फळ हे' वाघाटे' या नावानंदेखील ओळखलं जातं. महाराष्ट्राच्या प्रत्येक काना-कोपऱ्यातून विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक दिंडीत सहभागी होताता. पंढरपूरच्या दिशेनं निघाले असतानाच पांडुरंगाला हे फळ अर्पण करण्याची प्रथा आहे. आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी या फळाची भाजी खाऊन उपवास सोडण्याला महत्त्व आहे. सध्या हे गोविंद फळ बाजारात काही ठिकाणी दिसत आहे. या फळाला धार्मिकबरोबरच आयुर्वैदिक महत्त्वदेखील आहे. कारण, त्यामध्ये औषधी गुण खूप आहेत.
भाजी खाऊन सोडला जातो एकादशीचा उपवास : आषाढी एकादशीच्या पर्वावर पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसह राज्यभरात पांडुरंगाचे लाखो भाविक उपवास करतात. आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी 'गोविंद फळ' अर्थात वाघाट्याची भाजी खाण्याची जुनी परंपरा आहे. गोविंद फळाची भाजी खाऊन आषाढी एकादशीचा उपवास सोडला जातो. आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशीपासून सुमारे आठवडाभर हे फळ बाजारात मिळतं. सध्या आषाढी एकादशीला 14 दिवस आहेत. असे असले तरीही अमरावती शहरातील काही चौकांमध्ये हे फळ आतापासूनच विक्रीसाठी आलं आहे.
जंगलात आढळतात गोविंद फळाचे वेल : गोविंद फळ हे वेलीवर उगवणारं फळ आहे. गोविंद फळाची वेल ही जंगलातील एखाद्या झाडाच्या आश्रयानं वाढते. गोविंद फळाच्या वेलीला वाघाच्या नखासारखे काटे असतात. अनेकदा संपूर्ण वृक्ष या वेलीने व्यापते. यामुळं आता या वेलीला आलेली फळ ही झाडावरच आलीत का? असा भास होतो. अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी वरुड आणि मोर्शी तालुक्यात गोविंद फळाची वेल मोठ्या प्रमाणात आहे. यासोबतच मेघाच्या पायथ्याशीदेखील गोविंद वेल आढळते. अमरावती शहरालगत असणाऱ्या पोहरा आणि चिरोडीच्या जंगलात गोविंद फळ अर्थात वाघाटे सध्या मोठ्या प्रमाणात आले असल्याची माहिती विविध वनस्पतीचे जाणकार अनिल चौधरी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.
अनेक आजारांवर गुणकारी : वर्षातून एकदाच वेलीवर येणारं गोविंद फळ हे खायला हवं, असं अनिल चौधरी म्हणाले. "शरीरातील विषारी घटक आणि कफ यांचा नाश करण्यासाठी गोविंद फळ हे अतिशय गुणकारी आहे. नागीन या आजारावर गोविंद फळ अतिशय महत्त्वाचं औषध आहे. गोविंद फळ हे खायला अतिशय कडू असल्यामुळं या फळाची भाजी बनवून ती खावी. वर्षातून एकदा येणारं हे फळ खाल्ल्यामुळं वर्षभर अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो," असं देखील अनिल चौधरी यांनी सांगितलं.
पेरू आणि लिंबासारखे भासते फळ : गोविंद फळ हे वेलीवर अगदी लटपट वाढलेले दिसतात. सुरुवातीच्या अवस्थेत गोविंद फळ हे लिंबासारखे भासतात. काही दिवसांनी मोठं झाल्यावर जणू वेलीवर पेरूच लागलं की काय असा भास होतो. पेरूसारखाच हिरवा रंग आणि आकार तसंच तडक गोविंद फळ असतं. गोविंद फळ खायला अतिशय कडू असून हे फळ खाणं तितकंसं सोपं नाही. यामुळं गोविंद फळाची छान भाजी करूनच ते खाणं शक्य आहे.
गोविंद फळ का म्हटलं जात? : महाराष्ट्रात जवळपास सर्वच भागात जंगलाच्या ठिकाणी गोविंद फळ मिळतं. राज्याच्या बऱ्याच भागातून पंढरपूरकडे जाणारे वारकरी स्वतःसोबत गोविंद फळ सोबत घेतात. पंढरपूरला पांडुरंगाचे दर्शन घेऊन पांडुरंगाच्या चरणी अनेक भाविक गोविंद फळ वाहतात. पांडुरंगाला हे फळ अर्पण केलं जाते. त्यामुळे या फळाला 'गोविंद फळ' असं म्हटलं जातं.
हेही वाचा
- लुप्त झालेला रानपिंगळा 117 वर्षानंतर आला जगासमोर, मेळघाटात रानपिंगळ्याचा 'फालतू' शोध! - Amravati Ranpingla
- हैदराबादचे अब्दुल चाचा करतात वारकऱ्यांची सेवा, 25 वर्षांपासून सेवा देण्यात त्यांना मिळतोय आनंद - Ashadhi wari 2024
- जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यात आगमन; पाहा नयनरम्य व्हिडिओ - Sant Tukaram Maharaj Palkhi