मुंबई - Asha Bhosle photo biography : मुंबईतील 'सह्याद्री' शासकीय अतिथीगृह म्हणजे राजकीय घटनांचं केंद्रच. या वास्तूत राजकारण्यांची वर्दळ आणि राजकारण्यांच्या गरमागरम चर्चा नव्या नाहीत. मात्र बुधवारी 'सह्याद्री' अतिथीगृहाने सूरांचा शिडकावा अनुभवला. निमित्त होतं 'महाराष्ट्र भूषण' ख्यातनाम पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या फोटो बायोग्राफीचं प्रकाशनाचं! आशाताई आपल्या सुमधुर आवाजात 'अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही' सह अन्य गाणी गाताना कॅमेऱ्यात कैद झाल्या. यावेळी त्यांचे हे मंत्रमुग्ध करणारे स्वर ऐकण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार असे मोजके दर्दी रसिकश्रोते उपस्थित होते. अनौपचारिक गप्पांदरम्यान आशा भोसले यांनी आपल्या मधुर स्वरांनी वातावरण बदलून टाकलं. प्रत्यक्ष आशा भोसले केवळ आपल्या आग्रहावरुन गात आहेत, हा सुखद अनुभव यावेळी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि भाजपा नेता आशिष शेलार यांनी घेतला.
प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांनी आशाताईंच्या टिपलेल्या छायाचित्रांचं मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि व्हॅल्युएबल ग्रुपच्या सहयोगाने 'बेस्ट ऑफ आशा' हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते 'सह्याद्री' अतिथीगृहावर पार पडलं. यावेळी अमित शाह यांच्या आग्रहावरून आशाताईंनी काही गाणी गायली.
आशा भोसले यांच्या विविध भावमुद्रा आणि वेगवेगळ्या छायाचित्रांतून त्यांचं जीवन आणि गाणे या पुस्तकातून उलगडण्यात आलं आहे. सुमारे 42 विविध छायाचित्रं आणि त्या त्या प्रसंगाच्या काही आठवणी यांची अत्यंत देखण्या स्वरूपात मांडणी असलेला हा एक मौल्यवान दस्तऐवजच ठरावा अशी पुस्तकाची निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली.
मुंबई दौऱ्यावर असणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि आशा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर आज सकाळी या पुस्तकाच्या प्रकाशनाचा योग जुळून आला. या कार्यक्रमाला मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार त्यांची पत्नी ॲड. प्रतिमा शेलार यांच्यासह जनाई भोसले, आनंद भोसले, व्हॅल्युएबल ग्रुपचे अमेय हेटे, अंकित हेटे 'जीवनगाणी'चे प्रसाद महाडकर आणि पुस्तकाच्या डिझायनर नूतन आजगावकर आदी उपस्थित होते. यावेळी सर्वाधिक चर्चा झाली ती अर्थातच वयाच्या नव्वदीतही आशाताईंनी आपल्या सुरेल आवाजात गायलेल्या अविट गोडीच्या गाण्यांची.
हेही वाचा -