छत्रपती संभाजीनगर : काही दिवसांपूर्वी एआयएमआयएम पक्ष मुंबई लोकसभा लढवणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी दिली होती. त्याचा पुनरुच्चार पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला. "मुंबईचा निर्णय घेण्याबाबत आमची चर्चा सुरू आहे. लवकरच आम्ही निर्णय घेऊन त्याबाबत घोषणा करू. तिथे एवढा अत्याचार झाला. मात्र, धर्मनिरपेक्ष म्हणणारे कोणी गेले नाहीत. आता निवडणुकीत मतदानाची भिक मागायला मात्र जातील. महविकास आघाडीचं काय खरे नसून आम्ही आमच्या मार्गाने जाऊ," असेदेखील असदुद्दीन ओवेसी यांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबई लोकसभा लढवणार : छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये असदुद्दीन ओवेसी यांचा हा एका महिन्यात दुसरा दौरा आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबईमधून लढणार असल्याचं बोलल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा याबाबत चर्चा सुरू आहे, मीरा रोडवर झालेल्या हिंसाचार आणि तिथे करण्यात आलेल्या कारवाईनंतर तिथली परिस्थिती पाहता मुंबईतून एमआयएम लढणार असे संकेत दिले आहेत. मुंबईत बुलडोझर चालवत घर, दुकाने पाडली. अनेक कुटुंब बेघर झाले. अशा कुटुंबांना आधार देण्यासाठी इम्तियाज जलील हे मुंबईत निवडणूक लढतील असं म्हणाले होते. त्यावर पक्ष विचार करणार आहे. मुंबईत घरे पाडली, हे भाजपाचेच लोक आहेत. एकनाथ शिंदे यांना संविधान चालवायचे आहे की बुलडोझर चालवायचे? असा प्रश्न यावेळी असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थितीत केला.
महाविकास आघाडीचे काही खर नाही : "इंडिया आघाडीकडून मला निमंत्रण आलं नाही. इंडिया आघाडी राहील की नाही सांगता येत नाही. मात्र, जलील यांनी उलट त्यांच्याकडे ऑफर दिली होती. मात्र, त्यावर त्यांनी उत्तर पण दिलं नाही. त्यांची शांतता होकार आहे का? हे कळत नाहीय. मात्र, आम्ही आमच्या मार्गाने जाऊ. तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान होणार नाहीत. यासाठी आम्ही सर्व घटक पक्ष एकत्रित होवून निर्णय घेणार आहोत. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले आणि खासदार झाले. आमच्या पक्षाला नाव ठेवणारे आता भाजपासोबत जात आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सेनेला साथ देत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं होतं. त्याचवेळी हे सगळे सुरू झालं होतं," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
हेही वाचा :
1 पुणे पोलिसांची 'ड्रग्स मुक्त पुणे' ही प्राथमिकता, 4 कोटीचे ड्रग्स जप्त - पुणे पोलीस आयुक्त
2 लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणीत ठाकरे गटाची आघाडी, जाहीर केली निवडणूक समन्वयकांची यादी