चिंचपूर (अहमदनगर) Apple Farming Shirdi : संगमनेर तालुक्यातील अविनाश तांबे या 38 वर्षीय शेतकऱ्याने आपल्या शेतातील 20 गुंठे क्षेत्रात 280 सफरचंदाच्या रोपांची लागवड करत सफरचंदाची बाग फुलवली आहे. त्यामुळे काश्मीरचे सफरचंद आता चिंचपूरला पिकणार आहेत. सफरचंद बागेपासून चांगले उत्पन्न मिळणार असल्याची तांबे यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. परिसरातील शेतकऱ्यांसाठी सफरचंद शेतीचा हा प्रयोग लाभदायी ठरणार आहे.
अशा पध्दतीने केली लागवड : "सफरचंद फळाची बाग कशी करतात हे सोशल मीडियावर पाहून मी विचार केला की, आपणही हा प्रयोग आपल्या शेतात करून पाहूया." सोशल मीडियाच्या माध्यमातून काश्मीर येथील एका शेतकऱ्याशी संपर्क झाला आणि त्याच्याकडून 280 सफरचंदाची रोपे मागून घेतल्यानंतर शेतातील 20 गुंठे क्षेत्रात 13 फूट बाय 10 फूट लांब अंतरावर 2 बाय 2 फुटाचे तसंच दीड फूट खोलीचे खड्डे घेतले. त्यात सफरचंदाच्या एच. आर. 99 या जातीची एकूण 180 रोपांची लागवड केली.
योग्य नियोजनाने फुलली बाग : लागवड केलेल्या सफरचंद रोपांना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देण्याची व्यवस्था केली. सफरचंदासाठी जादा पाणी दिल्यास बुरशी लागते. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी देऊन औषध फवारणीसाठी बुरशीनाशक अँट्रकॉल 22 स्टिन एम 45 तसंच अळी जाण्यासाठी जैविक कीटक नाशकांचा वापर केला असल्याचं तांबे यांनी सांगितलं.
उन्हाळ्यात असे केले बागेचे रक्षण : उन्हाळ्यात उन्हापासून सफरचंद झाडाच्या रक्षणासाठी झाडांना हिरवी नेट बांधली. तीन वर्षांत रोपे मोठी झाली असून फळे येण्यास सुरुवात झालेली आहे. प्रत्येक झाडाला साधारणपणे 40 ते 45 फळे लागली आहेत. सफरचंदाचे पहिले फळ हे तीन वर्षानंतर सुरू होते. त्यानंतर प्रत्येक वर्षी सफरचंद येण्यास सुरुवात होते. पहिल्या वर्षी साधारणपणे 10 किलो फळे एका झाडाला लागली आहेत. दुसऱ्या वर्षापासून 15 ते 20 किलो फळे येण्यास सुरुवात होणार असल्याचं तांबे यांनी सांगितलं. सफरचंदाची फळे येण्यासाठी दोनशे तास थंड हवा मिळणे आवश्यक असते. उन्हाळ्यामध्ये 45 अंश सेल्सियसपर्यंत तापमान चालते असंही शेतकरी अविनाश तांबे यांनी सांगितलं.
सफरचंद बागेत आंतरपीक : सफरचंदाच्या बागेमधील जागेत घासाचे आंतरपीक घेण्यात येत आहे. सफरचंद झाडांना लागवडीनंतर तीन वर्षांनी पहिल्यांदाच फळे आली आहेत. सफरचंद शेतीतून चांगले उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा तांबे यांनी "ई टीव्ही भारतशी" बोलताना व्यक्त केली. तांबे यांच्या शेतातील सफरचंद शेती बघण्यासाठी जिल्ह्यातून अनेक शेतकरी येऊन माहिती घेत आहेत.
हेही वाचा :
- लोकसभा निवडणूक निकाल २०२४: शरद पवारांच्या चाणाक्य नीतीनं खेचून आणलं यश भाजपाला दिला 'धोबीपछाड' - Lok Sabha Election Result 2024
- प्रफुल पटेलांना मोठा दिलासा, ईडीनं सीजे हाऊसमधील मालमत्तेवर केलेली जप्तीची कारवाई रद्द - Praful Patel Money Laundering Case
- नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू आज तुमचे उद्या आमचे; संजय राऊतांचा मोठा दावा, 'कंगनाला मारणं चुकीचं' - Sanjay Raut On Kangana Beaten Case