मुंबई Annual Horticultural Exhibition : मुंबईत आले आणि वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला अर्थात राणीच्या बागेला भेट दिली नाही, असा पर्यटक, अभ्यासक विरळाच. इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी सर्वाधिक आकर्षण ठरते ते वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानात दरवर्षी भरवले जाणारे 'उद्यानविद्या प्रदर्शन'. यंदाचे प्रदर्शन 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी 2024 या कालावधीत होणार असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून देण्यात आली आहे.
शुक्रवारी होणार उद्घाटन : बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरणाद्वारे दरवर्षी आयोजित होणारे वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनाचे हे 27 वे वर्ष आहे. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आयोजित या भव्य प्रदर्शनाचे म्हणजेच ‘फ्लॉवर शो’चे शुक्रवारी (2 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता उद्घाटन होणार आहे. शुक्रवारी 11 ते रात्री 8 पर्यंत, तर दिनांक 3 आणि 4 फेब्रुवारीला सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले असणार असल्याची माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.
प्राण्यांच्या पुष्पप्रतिकृती : या प्रदर्शनासंदर्भात अधिक माहिती देत उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितलं की, सन 2015 पासून या प्रदर्शनाला विविध सृजनशील कल्पनांची जोड देण्यात येत आहे. त्यानुसार दरवर्षी एक वेगळा विषय घेवून हे प्रदर्शन मांडण्यात येते. यंदाच्या प्रदर्शनाचा विषय ‘ॲनिमल किंग्डम’ हा आहे. यात बागेच्या प्रवेशद्वाराजवळच झाडे, पाना-फुलांपासून हत्ती, वाघ आणि झेब्रा आदी प्राण्यांच्या तयार केलेल्या प्रतिकृती असणार आहेत. तसंच खास आकर्षण म्हणून परदेशातील काही निवडक भाजीपालादेखील या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्रांचे आयोजन : प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उद्यान विभागामार्फत मुंबईतील विविध वास्तुविशारद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, प्रात्यक्षिकाचा अनुभव घेता यावा, यासाठी 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी 2024 या दोन दिवसांत विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आय. ई. एस. महाविद्यालय, एल. एस. रहेजा महाविद्यालय, स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असून जवळपास 150-200 विद्यार्थी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेणार आहेत.
हेही वाचा -
- नाताळच्या सुट्ट्यामुळं पर्यटकांची राणीच्या बागेत प्रचंड गर्दी, गेट वे ऑफ इंडियावरही रीघ
- Rani Baug Mumbai : राणीबागेत पर्यटकांची गर्दी वाढली; राणीबाग रोज खुली ठेवण्याची पर्यटकांची मागणी
- Kishori Pedekar on Ranibag Work : राणीबागेच्या कामात भ्रष्टाचार नाही, हे विरोधक कमी वैरी जास्त - महापौर किशोरी पेडणेकर