नागपूर Anil Deshmukh Allegations : कथित 100 कोटी खंडणी वसुली प्रकरणात सचिन वाजे यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळं राज्यभर पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी आज अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "सचिन वाजे हा दहशतवादी खटल्यातील आरोपी आहे. त्यासह दोन खुनातील सचिन वाजे हा आरोपी आहे. मात्र, माझ्यावर आरोप करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना वाजेंची मदत घ्यावी लागली," असा जोरदार हल्लाबोल अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला.
देवेंद्र फडणवीस यांनी आरोपीची घेतली मदत : सचिन वाजे यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला. कथित 100 कोटी रुपयांच्या वसुली आरोपावरुन सचिन वाजे यांनी आरोप केल्यानंतर मोठं राजकारण तापलं. सचिन वाजे यांच्या आरोपानंतर भाजपा नेते हे आता अनिल देशमुख यांच्यावर तुटून पडले. फडणवीस यांनीही अनिल देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला होता. आता अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला. "देवेंद्र फडणवीस यांना सचिन वाजे यांची माझ्यावर आरोप करण्यासाठी मदत घ्यावी लागली. वाजे हे दोन खुनातील आरोपी आणि दहशतवादी खटल्यातील आरोपी आहेत," असा हल्लाबोल अनिल देशमुख यांनी केला.
मला चांदीवाल आयोगानं क्लिन चिट दिल्याचा दावा : "माझ्यावर आरोप करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना सचिन वाजेंची मदत घ्यावी लागली. माझ्यावर आरोप झाले तेव्हा या आरोपांची चौकशी व्हावी, असं मी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सांगितलं. त्यावेळी त्यांनी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती चांदीवाल यांच्याकडं या प्रकरणाची चौकशी सोपवली. 11 महिन्यात सविस्तर चौकशी करुन माजी न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 1400 पानांचा अहवाल 2 वर्षांपूर्वी सरकारला सादर केला होता. त्या अहवालात मला क्लीन चिट देण्यात आली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी हा अहवाल बाहेर येऊ दिला नाही. चांदीवाल यांचा 1400 पानांचा चौकशी अहवाल सार्वजनिक करा," अशी मागणीही यावेळी अनिल देशमुख यांनी केली.
भाजपाचा पलटवार : "अनिल देशमुख यांना माझी विनंती आहे की, सचिन वाजे नार्को टेस्टला सामोरे जाण्यास तयार आहेत. अनिल देशमुख यांनी असंही सांगायला हवं होतं की मी तपासासाठी, नार्को टेस्टसाठी तयार आहे, पण ते फक्त देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलतात. आपला भ्रष्टाचार उघडकीस येण्याची भीती महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे," असा पलटवार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देशमुखांवर केलाय.
हेही वाचा :
- कैदेतील सचिन वाजेला प्रसार माध्यमांशी बोलण्याची परवानगी कशी? वाजेच्या बंदोबस्तातील पोलिसांना निलंबित करण्याची कॉंग्रेसची मागणी - Atul Londhe On Sachin Waze
- अंडरवल्ड डॉन दाऊद, छोटा शकील ते अँटिलिया; नेहमीच वादग्रस्त राहिली सचिन वाजे यांची कारकीर्द - Sachin Vaze Controversial
- "देवेंद्र फडणवीस यांची नवी चाल..."; हायकोर्टाचा निकाल दाखवत अनिल देशमुखांचा गंभीर आरोप - Anil Deshmukh On Sachin Waze