पिंपरी चिंचवड Building Leaned : पिंपरी चिंचवडमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाकड परिसरात एक बांधकाम सुरू असलेली इमारत मध्यरात्री अचानक एका बाजूला झुकली. इमारत पडणार अशी माहिती समोर येताच नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्यानंतर स्थानिकांनी धोकादायक इमारत पडणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाला दिली. त्यांनतर या इमारतीला खालच्या बाजूनं सपोर्ट देण्यात आला होता. अखेर आज दुपारी 12 वाजेच्या सुमार महापालिकेच्या वतीनं ही धोकादायक इमारत जमीनदोस्त करण्यात आली.
इमारत झुकल्यानं परिसरात दहशत : थेरगाव येथील दुर्गा कॉलनीतील काळा खडक-वाकड पोलीस स्टेशन रस्त्यावरील एक बांधकाम सुरु असलेली इमारत मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास झुकल्यानं परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती. शेजारच्या इमारतीला आधीच जोडलेली ही रचना हलवण्यास सुरुवात झाली होती. यानंतर परिसरातील रहिवाशांनी पिंपरी चिंचवड अग्निशमन दल आणि पोलिसांना त्वरीत सूचना दिली. या घटनेनं दाट लोकवस्तीच्या परिसरात चिंता निर्माण झाली होती. रात्री राहुल सरोदे यांनी तातडीनं अग्निशमन दलाला सूचना दिली होती.
आज सकाळी इमारत जमीनदोस्त : यानंतर मध्यरात्री महापालिकेनं या इमारतिला पोकलेनच्या साहाय्यानं सरळ करण्याचे प्रयत्न केले होते. तसंच या इमारतीला खालून सपोर्टही देण्यात आला होता. आज सकाळी इमारतीच्या मालकांनां पूर्वकल्पना दिल्यानंतर महापालिकेच्या वतीनं ही धोकादायक इमारत जमीन दोस्त करण्यात आलीय.
काय म्हणाले अधिकारी : याविषयी बोलताना महापालिका बांधकाम विभागाचे अधिकारी मकरंद निकम यांनी सांगितलं की, "या बिल्डिंगला बांधण्यासाठी सर्व परवाने दिले गेले होते. बिल्डिंगच्या मालकांनी या बिल्डिंगचं बांधकाम सुरु केलं होतं. त्यानंतर या इमारतीचं तीन मजली बांधकाम देखील झालं होतं. मात्र, काल रात्री अचानक ही बिल्डिंग पुढं झुकली. त्यामुळं आजूबाजूच्या इमारतींसाठी धोका निर्माण झाला होता. अखेर आज अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या बिल्डिंगला पोकलेन आणि जेसीबीच्या साहाय्यानं जमीनदोस्त करण्यात आलंय."
हेही वाचा :