मुंबई : देवेंद्र फडणवीस हे सहाव्यांदा आमदार आणि तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. ही मोठी आनंदाची बाब आहेच मात्र तेवढीच जबाबदारीची बाब देखील आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली. त्यांच्याकडं संयम, जिद्द आणि मोठ्या प्रमाणात चिकाटी आहे. ते जी गोष्ट ठरवतात, ती करून दाखवतातच, अशा शब्दात अमृता यांनी त्यांचे पती देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. त्यांचं जीवन एक संघर्ष आहे. कोणत्याही क्षेत्रात संयम आणि चिकाटी अत्यंत महत्त्वाची असते, असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी “ पलट के आऊंगी शाखों पे खुशबुएँ लेकर, खिज़ां की ज़द में हूँ मौसम ज़रा बदलने दे" अशा ओळीची पोस्ट शेयर केली त्यावर “ वो मोसम अब बदल चुका है", असं ठासून सांगितलं. त्यांच्या “ वो मोसम अब बदल चुका है" हे वक्तव्य सध्य चर्चेत आहे.
राज्यातील बहिणींनी महायुतीला साथ दिली : "महायुती एकत्र आहे असून त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रगतीकडं गतीनं वाटचाल करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लाडकी बहीण योजना चांगली योजना आहे. राज्यातील बहिणींनी देवेंद्र फडणवीस आणि महायुतीला साथ दिली आहे. संसदेत, विधिमंडळात महिलांचं प्रमाण वाढावं, यासाठी महिला आरक्षण विधेयक यापूर्वीच मंजूर करण्यात आलं आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी होईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. "मी पुन्हा येईन ही घोषणा फडणवीसांनी त्यांना खुर्ची मिळावी, यासाठी केली नव्हती. महाराष्ट्राच्या विकासासाठी जे काम ते करु शकतील, तसं काम इतर कोणी करु शकणार नाहीत. त्यामुळे राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी ही घोषणा केली होती. त्यांना त्याबाबत पूर्ण विश्वास होता. आता ते पुन्हा आले आहेत," असे त्या म्हणाल्या.
कोणतेही पद मिळाले तरी लोकसेवाच केली असती : "देवेंद्र फडणवीस यांना कोणतंही पद मिळालं, तरी त्या माध्यमातून त्यांनी लोकसेवाच केली असती, असा मला विश्वास आहे. राज्यातील लाडक्या बहिणी मोठ्या संख्येनं आणि मोठ्या प्रेमानं त्यांच्या पाठीशी उभ्या असल्याचं मला देखील प्रचारादरम्यान दिसून आलं. लोकसभेला जे फेक नरेटिव्ह सेट करण्यात आलं होतं ते दूर झाल्याचे चित्र प्रचारादरम्यान आपल्याला दिसलं. भाजपा सोबत जेव्हा धोका झाला होता त्यावेळी आपण एक पोस्ट केली होती, “पलट के आऊंगी शाखों पे खुशबुएँ लेकर, खिज़ां की ज़द में हूँ मौसम ज़रा बदलने दे “ वो मोसम अब बदल चुका है, आम्ही त्यामधून आता बाहेर निघालो आहोत. प्रथम क्रमांकानं बाहेर निघालो आहोत," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
हेही वाचा :
- अमृता यांनी देवेंद्र फडणवीस यांना रोमँटिक नसल्याचं म्हटल्यानंतर ट्रोलर्सनी घेतलं निशाण्यावर - Amrutas video viral
- पाच वर्षात देवेंद्र फडणवीसांच्या संपत्तीत मोठी वाढ; पत्नीकडून घेतलं कर्ज, एकूण संपत्ती किती?
- EXCLUSIVE : "देवेंद्र फडणवीस यांच्या जनसेवेची 25 वर्ष पूर्ण", पत्नी अमृता आणि लेक दिविजा काय म्हणाल्या? पाहा व्हिडिओ