अमरावती Ranpingla In Amravati : घुबड अर्थात रानपिंगळा या पक्षाच्या भारतात 30 पेक्षा अधिक प्रजाती आहेत. या 30 प्रजातींपैकी केवळ रानपिंगळा हा दिवसा शिकार करणारी एकमेव प्रजात आहे. 1880 मध्ये रानपिंगळा या पक्षाची भारतात नोंद झाल्यावर सुमारे 117 वर्ष हा पक्षी लुप्त झाला असं मानण्यात आलं. मात्र, रानपिंगळा कोरकू भाषेतला 'डोंगर डूडा' हा मेळघाटच्या कुशीत कायम होता. 1997 मध्ये मेळघाटातील रानपिंगळा जगासमोर आला. त्यानंतर मेळघाटातील या रानपिंगळ्यावर संशोधन व्हायला लागलं. शिवाय पुस्तकंही प्रकाशित झाली. परंतु, रानपिंगळा ज्या व्यक्तीमुळं जगासमोर आला त्या व्यक्तीचं नाव कधी समोर आलंच नाही. 'ईटीव्ही भारत' नं मेळघाटातील अतिशय दुर्गम भागात वसलेल्या चौराकुंड या गावातील रहिवासी असणारे आणि खऱ्या अर्थानं मेळघाटातील रानपिंगळा जगासमोर आणणारे फालतू कासदेकर-पटेल यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्या दृष्टीतून रानपिंगळा समजून घेण्याचा प्रयत्न केला.
चौराकुंड परिसरात 50 ते 60 जोडपी : मेळघाटात विविध भागात मोठ्या संख्येत रानपिंगळा आढळतो. चौराकुंड परिसरातील जंगलात रानपिंगळ्याची 50 ते 60 जोडपी असल्याचं फालतू पटेल यांनी सांगितलं. रानपिंगळाच्या छातीवर पांढऱ्या आकाराचा ठसा असतो. यापैकी नर रानपिंगळ्याच्या छातीवर असणाऱ्या ठशाचा आकार आणि मादा रानपिंगळ्याच्या छातीवरील आकार यात असणाऱ्या फरकावरून आपल्यासमोर असणारा रानपिंगळा हा नर आहे की मादा हे ओळखता येतं, अशी माहिती फालतू पटेल यांनी दिली.
आवाज देऊन बोलवतात : चौराकुंड या गावात गेल्यावर रानपिंगळा पाहायचा तर तो कधीही सहज दिसत नाही. रानपिंगळा पाहण्यासाठी फालतू पटेल हे सोबत असावे लागतात. गावालगतच्या जंगलात फालतू पटेल हे स्वतः रानपिंगळ्याचा आवाज काढत त्याला बोलावण्याचा प्रयत्न करतात. विशेष म्हणजे फालतू पटेल यांनी काढलेल्या आवाजाला जंगलात दुरून रानपिंगळा प्रतिसाद देतो. ज्या दिशेनं रानपिंगळा प्रतिसाद देतो त्या भागात फालतू पटेल रानपिंगळा दाखवण्यासाठी नेतात. या भागात असणाऱ्या सागवानाच्या उंच झाडावर अगदी टोकावर एखाद्या फांदीवर पानांच्या आतमध्ये रानपिंगळा बसलेला आढळतो. उन्हाळ्यात पान गळतीमुळं झाडावर बसलेला रानपिंगळा सहज दिसतो. आता जंगल हिरवेगार असल्यामुळं रानपिंगळा पाहण्यासाठी जंगलात दूरपर्यंत जावं लागतं.
असं आहे रानपिंगळाचं वैशिष्ट्य : राखाडी रंगाचा असणारा रानपिंगळा हा घुबड प्रजातीमधील एकमेव दिनचर आहे. उंदीर हे त्याचं सर्वात आवडतं खाद्य आहे. यासह साप, पाल, सरडे हे देखील रानपिंगळा खातो. उंदीर सर्वात जास्त आवडत असल्यामुळं अनेकदा गावालगत उंदरांच्या शोधात रानपिंगळा येतो. ज्या भागात गवत मोठ्या प्रमाणात वाढलंय अशा भागात उंदीर सहज सापडत असल्यामुळं गवताळ प्रदेशालगतच्या जंगलात रानपिंगळा नेहमीच आढळतो, असं फालतू पटेल यांनी सांगितलं. तसंच गरुड, कावळा, घार हे रानपिंगळ्याचे शत्रू असल्याचंही ते म्हणाले.
वन्यजीव अभ्यास क्षेत्रातील अनेकांना दिली माहिती : लुप्त झाला असा समज असणारा रानपिंगळा हा मेळघाटाच्या कुशीत अगदी सुरक्षित असल्याची माहिती जगासमोर आल्यावर वन्यजीवांचा अभ्यास करणारी अनेक मंडळी चौराकुंड परिसरात फालतू पटेल यांना भेटायला आली. सातपुडा फाउंडेशनचे संस्थापक आणि बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटीचे संचालक किशोर रिठे, सहाय्यक संचालक राजू कसंबे, वन्यजीव वैज्ञानिक प्राची मेहता, गुजरात मधील वन्यजीव अभ्यासक मुकेश भट, अमरावतीचे पक्षी अभ्यासक प्रा. जयंत वडतकर यांच्यासह विविध राज्यातील वन विभागाचे अधिकारी यांना त्यांनी चौराकुंड भागातील जंगलात रानपिंगळा अनेकदा दाखवला. सुरुवातीच्या काळात अनेक जण महिन्यातून चार-पाच वेळा येत होते, असं देखील फालतू पटेल म्हणाले.
फालतू पटेल यांची खंत : या जंगलातील रानपिंगळांची संख्या किती हे जाणून घेण्यासाठी रानपिंगळांना पकडून त्यांना टॅग लावण्याची मोहीम राबविण्यात आली. हे असं करत असताना अनेक रानपिंगळे दगावले. मुक्त पक्षांवर हा असा अन्याय वेदनादायी असल्याची खंत फालतू पटेल यांनी यावेळी व्यक्त केली. चौराकुंड येथील वनविभागाच्या विश्रामगृह येथे खानसामा म्हणून फालतू पटेल काम करतात. त्यांनी दाखवलेल्या रानपिंगळा संदर्भात अनेकदा विश्रामगृह याठिकाणी पक्षी मित्रांचे सोहळे आयोजित केले जातात. त्या सगळ्यांसाठी फालतू पटेल स्वयंपाक करतात. त्या ठिकाणी होणाऱ्या रानपिंगळावरील चर्चेत आम्हाला रानपिंगळा दाखवणारी व्यक्ती हा फालतू आहे असं कधीही कोणी सांगत नाही याबाबत आश्चर्य वाटतं, असंही पटेल म्हणाले.
हेही वाचा -