अमरावती : शिक्षणाचा दूरपर्यंत संबंध नाही, अशा भटक्या समाजात वडील शिकार करायचे. कधी दारू काढायचेत. आई भीक मागायची. घरात गरिबी आणि तांड्यात जिकडं-तिकडं दारुचा महापूर अशा अवस्थेत कशीबशी शिक्षणाची दिशा मिळाली. पाच चिमुकल्या भावंडांसह निकिता शाळेत जायला लागली. तिने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळवल्यावर समाजकारण, राजकारण असा प्रवास करत निकितानं शासकीय नोकरी मिळवली. आज अमरावतीच्या जलसंपदा विभागात ती अनुलेखक पदावर तीन-चार महिन्यांपासून रुजू झालीय. अमरावती शहरातील वडाळी येथील तांड्यात लहानाची मोठी झालेल्या निकिताचा हा प्रवास सोपा नव्हता. निकिताच्या या संघर्षमय खडतर प्रवासासंदर्भात 'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट.
आईला वाटायचं मुलांनी शिकावं : "शिकार करणं हे वडिलांचं काम आणि भीक मागून स्वतःसह घरातील सर्व सदस्यांचं पोट भरणं हे काम आई करायची. आम्ही सहा भावंड होतो. आईला शिक्षणाची आवड होती. मात्र, तिला शिकायला मिळालं नाही. आपल्या मुलांनी शिकावं असं तिला नेहमी वाटायचं. आई स्वतः रात्रीच्या शाळेत जायची. आम्ही लहान असतानाच परिसरात ख्रिस्त मिशनरीच्या शाळेतील सिस्टर ट्रिजा यांनी माझ्यासह माझ्या सर्व भावंडांना शिकवावं याबाबत आईला मार्गदर्शन केलं. माझं नाव होलीक्रॉस मराठी शाळेत घातलं गेलं", असं निकिता पवारनं 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधताना सांगितलं.
शिक्षकांनी दिली प्रेरणा : " शाळेतच मी हॉस्टेलमध्ये राहायला लागली. शाळेतील शिक्षिका सिस्टर क्लारीना यांच्यासह इतर शिक्षक हे नेहमीच तुम्ही तुमच्या समाजासाठी काही केलं पाहिजे याबाबत मार्गदर्शन करत. तुम्ही चांगलं शिका, असं शिक्षक नेहमी म्हणायचे. त्यांच्या बोलण्याचाच परिणाम माझ्यावर होत गेला. दहावी उत्तीर्ण झाल्यावर इंदिराबाई मेघे महाविद्यालयातून बारावी आणि कला शाखेत पदवीचं शिक्षण घेतलं. कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठातून बीएड केलं. समाजशास्त्र विषयात पदवीत्तर पदवी मिळवली हे सारं काही शिक्षकांच्या प्रेरणेमुळंच झाले," असं निकिता सांगते.
सुट्ट्यांमध्ये मागितली भीक : होलीक्रॉस शाळेतील वसतीगृहात निकिता राहत होती. दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत ती घरी याय. ची तेव्हा वडील तीतर, बटेर पकडायला जायचे. "आम्हा सहा बहीण भावांची जेवणाची सोय लागत नव्हती. अशा परिस्थितीत शेजारच्या मुला-मुलींसोबत घरातलं भांड घेऊन मी भीक मागायला जायचे. ज्या लग्नामध्ये मी भीक मागायला जायचे, त्या लग्नात माझ्या शाळेतील मुली छान कपडे घालून यायच्या, हे सर्व पाहून मला लाज वाटायची. पण ईलाज नव्हता. आमची परिस्थितीच तशी होती. मात्र, इतर मुलींसारखं आपणही राहावं असं वाटायला लागलं. भीक मागणं सोडून अभ्यासाकडं लक्ष दिलं", असं निकितानं सांगितलं.
- पीएचडीची तयारी सुरू : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून सध्या निकिता पवार ही पीएचडीची तयारी करत आहेत. "फासेपारधी जमातीतील बालकांचे शैक्षणिक व आरोग्य विषयक समाजशास्त्रीय अध्ययन" हा निकिताचा संशोधनाचा विषय आहे. प्रा. डॉ. अरुण चव्हाण यांच्या मार्गदर्शनात संशोधन कार्य सुरू असल्याचं निकितानं सांगितलं.
समाजातील मुलांसाठी काढली शाळा : आपल्यासारखंच आपल्या समाजातील मुलांनी देखील शिकावं या उद्देशानं निकिता पवार हिनं अमरावती शहरालगत असणाऱ्या राजुरा या गावात तांड्यात राहणाऱ्या मुलांना शिक्षण मिळावं या उद्देशानं एका टेकडीवर शाळा सुरू केली. 'आपली राहुटी' हा प्रकल्प 2019 मध्ये निकितानं सुरू केल्यावर माजी विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे यांनी तिच्या कामाची दखल घेत मदतीचा हात दिला. प्रवीण पोटे यांच्यासह भाजपाचे तुषार भारतीय यांनीदेखील मोलाचं सहकार्य केलं. या सर्व मंडळींची आभारी असल्याचं सांगत निकिता कृतज्ञता व्यक्त करते.
पतीनं दिली हिम्मत : पदवीपर्यंतचं शिक्षण घेतल्यावर निकितानं जयेश चंद्रमोहन राजे यांच्याशी आंतरजातीय विवाह केला. "मला शिक्षणाची आवड असल्यामुळं पुढच्या शिक्षणासाठी पतीनं मदत केली. माझी समाजाबाबत असणारी तळमळ पाहता माझ्या पतीला मी राजकारणात जावं असं वाटायचं. त्यांनी दिलेल्या हिमतीमुळं मी 2016 मध्ये जिल्हा परिषदेच्या अंजनगाव बारी सर्कलमधून निवडणूक लढवली. माझा पराभव जरी झाला असला तरी या निवडणुकीनं मला समाजासाठी भांडायला शिकवलं. निवडणुकीच्या अनुभवातून मी आमच्या समाजाचे अनेक प्रश्न शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला", असं निकिता सांगते.
पैसाच नको शाबासकीही हवी : पुढं ती म्हणाली, "आमच्या समाजातील मुलांना केवळ पैसाच नको तर प्रेरणादायी काम करणाऱ्यांना शाबासकीही हवी. अनेकांनी मला प्रोत्साहन दिलं, प्रेरित केलं. यामुळंच आमच्या समाजातील प्रश्न मी प्रशासनासमोर अनेकदा मांडू शकले. राजुरा येथे आमच्या सेतू फाउंडेशन अंतर्गत आम्ही मुलांचं वसतीगृह सुरू करत आहोत. अनाथ मुलांना हक्काचा निवारा या वसतीगृहात देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या मुलांचं सर्व शिक्षण मी स्वतः करेन."
शासकीय नोकरीमुळं मिळालं बळ : "माझ्या समाजातील दहापैकी एका मुलाचं तरी भलं माझ्याकडून व्हावं, असा माझा प्रयत्न आहे. आमच्या समाजातील मुलं शिकावीत मोठी व्हावीत, हे माझं स्वप्न आहे. माझ्या शाळेचं काम पुढंदेखील सुरूच राहीन. खरंतर आता मी शासकीय सेवेत आहे. शासकीय सेवेमुळं माझा पैशांचा प्रश्न बऱ्यापैकी सुटला. तसंच शासकीय नोकरीमुळं मला समाजातील मुलांसाठी काम करण्यास आणखी बळ मिळालं," असंही निकितानं सांगितलं.
हेही वाचा -
- आई-वडिलांच्या कष्टाचं चीज, पेंटर कामगाराचा मुलगा झाला 'क्लास वन अधिकारी', गावात जंगी स्वागत - MPSC Success Story
- मुलगा अभियंता होण्यासाठी आई-वडिलांनी गहाण ठेवलं शेत; आज 'त्याची' व्यवसायात 60 कोटी रुपयांची उलाढाल, 'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट - Nilesh Sabe Success Story
- अपघातात पाय गमावले; शिवणकाम आणि शिकवणी घेऊन घडवलं करिअर, जाणून घ्या सुनिता कुरकुटे यांची यशोगाथा - Sunita Kurkute