अमरावती Amravati Crime News : अमरावती शहरातील नांदगाव पेठ ते कठोरा गांधी मार्गावर 21 एप्रिलला एका पुरुषाचा अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर आता मृत व्यक्तीच्या हत्येचा कट त्याच्या पत्नीनं रचल्याची बाब समोर आलीय. दरम्यान, या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आलीय.
नेमकं काय आहे प्रकरण? : मिलिंद सौदागर वाघ (वय 42) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. ते माजी सैनिक होते, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. 19 एप्रिल 2024 रोजी रात्री नऊ वाजेपासून ते बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाइकांनी नांदगावपेठ ठाण्यात नोंदविली होती. त्यानंतर 21 एप्रिलला कठोरा गांधी मार्गावर एका शेताजवळ रस्त्याच्या कडेला मिलिंद सौदागर वाघ यांचा कुजलेला मृतदेह आढळला होता. त्यानंतर मृत मिलिंद वाघ यांचे लहान भाऊ प्रशांत वाघ यांनी या प्रकरणी आपल्या भावाच्या पत्नीवर दाट संशय असल्याचं पोलिसांना सांगितलं. त्यानंतर मृतकाची पत्नी वर्षा वाघची पोलिसांनी कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान मृतकाच्या पत्नीनं तिघांसह मिळून आपल्या पतीचा खून केल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी पत्नीसह कटात सहभागी एकूण चौघांविरुद्ध हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. शुभम भोयर, संकेत बोळे, कार्तिक कडूकर आणि मृतकाची पत्नी वर्षा वाघ, अशी हत्येचा गुन्हा दाखल झालेल्या चौघा आरोपींची नावं आहेत.
8 मे पर्यंत पोलीस कोठडी : शनिवारी (4 मे) या चौघांनाही न्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयानं या चारही जणांना 8 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसंच या संपूर्ण प्रकरणाबाबत नेमकं तथ्य चौकशीत समोर येईल, अशी माहिती नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत डोपेवाड यांनी दिलीय.
हेही वाचा -