अमरावती Monument Erected By British : भारतीय स्वातंत्र्य लढा तीव्र होत असताना 16 फेब्रुवारी 1935 मध्ये अचानक मेळघाटातील हरिसाल लगतच्या जंगलाला आग लागली. यावेळी जंगलातील आग विझवण्यासाठी तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी नाझीर मोहम्मद हे आपल्या सहकाऱ्यांसह जंगलात शिरले. आग विझवण्याचे प्रयत्न करत असताना नाझीर मोहम्मद यांच्या जवळ आगीचा मोठा भडका उडाला. यात ते भाजले गेले. त्यांच्यासोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांना जंगलातून बाहेर काढून अमरावतीतील रुग्णालयात दाखल केलं. मात्र, सात दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 23 फेब्रुवारी 1935 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
जंगल वाचविण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या नाझीर मोहम्मद यांचा इंग्रजांकडून मरणोत्तर सन्मान करण्यात आला. त्यावेळी इंग्रजांनी त्यांच्या स्मरणार्थ हरिसाल येथे त्यांचं स्मारक उभारलं. आजही हे स्मारक मेळघाटातील वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जंगल संरक्षणाची प्रेरणा देत आहे.
असे आहे स्मारक : हरिसाल येथील चौकशी फाटकाजवळ धारणीकडं जाताना डाव्या बाजूला नाझीर मोहम्मद यांच्या स्मृतीत विशेष स्मारक उभारण्यात आलंय. चुना आणि मातीचा ओटा बांधून त्यावर फरश्या बसवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी नाझीर मोहम्मद यांच्या कार्याची माहिती संगमरवरी दगडामध्ये कोरण्यात आलीय. तसंच या स्मारकाच्या चारही बाजूनं फुलांची झाडं लावण्यात आली आहेत. तर स्मारकाच्या ठिकाणी कुंपण घालून फाटक बसवण्यात आलंय. या स्मारकाला 89 वर्ष झाली असली तरी हे स्मारक तशाच स्थितीत आहे. हरिसाल येथील रहिवासी कस्तुरे कुटुंबाच्या वतीनं या स्मारक परिसराची स्वच्छता राखली जाते. संपूर्ण कुटुंब या स्मारकाची काळजी घेत असल्याचं रुपेश कस्तुरे यांनी सांगितलं.
देशभरातील वनसंरक्षकांसाठी नाझीर मोहम्मद यांची प्रेरणा : वनविभागात जंगल संरक्षणाच्या उद्देशानं वनसंरक्षक म्हणून रुजू होणाऱ्या सर्वांना प्रशिक्षणादरम्यान वरिष्ठांकडून हरिसाल येथे जंगल वाचविण्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या नाझीर मोहम्मद यांचं उदाहरण दिलं जातं. डेहराडून येथे होणाऱ्या प्रशिक्षणा दरम्यान देशभरातील सर्व नव्या अधिकाऱ्यांना नाझीर मोहम्मद यांच्याबाबत माहिती सांगण्यात येते. खरंतर नाझीर मोहम्मद हे देशातील प्रत्येक वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचं हरिसाल येथील विद्यमान वनसंरक्षक गिरीश जतकर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितलं.
23 फेब्रुवारीला वाहतात श्रद्धांजली : हरिसाल या ठिकाणी असणाऱ्या नाझीर मोहम्मद यांच्या स्मारकावर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वतीनं दरवर्षी 23 फेब्रुवारीला त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला जातो. हरीसाल वन वर्तुळातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह गावातील बरेच नागरिक 23 फेब्रुवारीला नाझीर मोहम्मद यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या स्मृतीला उजाळा देत असल्याचं गिरीश जतकर यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- डरकाळी फोडत आला वाघ: मेळघाटच्या जंगलात पर्यटकांनी अनुभवला थरार; व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा - Melghat Tiger Reserve
- जंगल परिसरातील विहिरींना नाहीत कठडे; मेळघाटसह अनेक भागात वन्य प्राण्यांच्या जीवाला धोका
- मेळघाटात 'सिपना पटेल'चा आहे अनोखा थाट, जाणून घ्या आदिवासी बांधव का करतात 'सिपना पटेल' वृक्षाची पूजा