अमरावती Girl Kidnapping Case : अमरावती शहरातील फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कलोती नगर परिसरात प्रणाली वैद्य यांचे सार्थक पाळणाघर आहे. 25 जानेवारीला नेहमीप्रमाणे तीन वर्षांच्या चिमुकलीला तिच्या आईनं सकाळी साडेनऊ वाजता पाळणाघरात सोडून ती कामानिमित्त बाहेर निघून गेली. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास चिमुकलीचे वडील उज्वल रामलाल भालाधरे (35) हा मित्रासह पाळणाघरात एका मित्रासह आला. मला माझ्या मुलीला भेटायचे आहे असं त्याने पाळणा घराच्या संचालिका प्रणाली वैद्य यांना सांगितले. तुम्हाला मुलीला भेटता येणार नाही, असं प्रणाली वैद्य उज्वल भालाधरे यांना म्हणाल्या. मात्र उज्वल मलाधरे यांनी पाळणाघर संचालिकेला न जुमानता मुलीला खेचत पाळणाघराबाहेर आणले.
पोलीस ठाण्यात दिली तक्रार: उज्वल आणि त्याच्या मित्रानं तीन वर्षांच्या चिमुकलीला कुटीवर बसवून पळ काढला होता. यावेळी पोलिसात तक्रार दिली तर तुम्हाला पाहून घेईल, अशी धमकीदेखील त्यानं पाळणाघराच्या संचालिकेला दिली. या प्रकाराची माहिती पाळणाघराच्या संचालिका प्रणाली वैद्य यांनी चिमुकलीच्या आईला सांगितली. यानंतर थेट फ्रेझरपुरा पोलीस ठाणे गाठून झालेल्या प्रकाराची तक्रार दिली होती.
17 दिवसानंतर चिमुकली आईच्या स्वाधीन: पाळणा घरातून चिमुकलीचं अपहरण करणारा उज्वल भालाधरे याचा शोध फ्रेझरपुरा पोलीस घेत होते. तो चांदूरबाजार तालुक्यातील हिवरा पूर्णा गावात असल्याचं पोलिसांना कळताच पोलिसांनी हिवरा पूर्णा गावात जाऊन त्याला अटक केली. त्याच्याकडे असणाऱ्या तीन वर्षांच्या चिमुकलीला अमरावतीला आणून तब्बल 17 दिवसानंतर तिला आईच्या स्वाधीन केले. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मनीष बनसोड सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र सहारे, पोलीस उपनिरीक्षक विजय गीते, हेड कॉन्स्टेबल लता उईके, डीबी पथक प्रमुख सुनील सोळंके, रज्जा शेकूवाले, शेखर गायकवाड यांच्या पथकानं ही कारवाई केली.
हेही वाचा:
- मला 6 वर्षे नको, 14 वर्षांसाठी हद्दपार करा-काँग्रेसमधील हकालपट्टीनंतर आचार्य प्रमोद कृष्णम यांची आगपाखड
- पोलीस आयुक्त अमितेशकुमार फडणवीसांचे लाडके, त्यांनी राजकारणातील गुंडांची परेड घ्यावी- असीम सरोदे यांचे टीकास्र
- पोलीस आयुक्त अमितेशकुमार फडणवीसांचे लाडके, त्यांनी राजकारणातील गुंडांची परेड घ्यावी- असीम सरोदे यांचे टीकास्र