कोल्हापूर : पाच दशकांपासून चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे 'बिग बी' अर्थात महानायक अमिताभ बच्चन यांच्या 82 वा वाढदिवसानिमित्त कोल्हापूरमधील चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. अमिताभ बच्चन एक्स्टेंडेड फॅमिली टीम कोल्हापूर आणि अमिताभ फॅन्स क्लब वर्ल्डवाईड यांच्या वतीनं करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरात उगवत्या सूर्याच्या साक्षीनं 82 दीप प्रज्वलित केले. बच्चन यांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. अनेक सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या अभिताभ बच्चन यांच्या चाहत्यांनी साजरा केलेला हा 'अनोखा' वाढदिवस सध्या कोल्हापुरात चर्चेचा विषय ठरलाय.
कोल्हापुरात अभिताभ बच्चन यांच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांनी 2017 मध्ये समाजातील उपेक्षित वंचित घटकांना मदत करण्यासाठी या व्यासपीठाची निर्मिती केली. तेव्हापासून आतापर्यंत एड्सग्रस्त बालक, निराधार महिला, अबालवृद्ध यांना आधार देणे आदी सामाजिक कार्य कोल्हापुरातील ही मंडळी करत आहेत. बच्चन यांचा वाढदिवस शारीरिक व्याधींनी ग्रासलेल्या मुलांसोबत साजरा करण्यात येतो. गेल्या अनेक वर्षांपासून शारीरिक व्याधींनी ग्रासलेल्या मुलांना आनंद देण्याचा प्रयत्न बच्चनच्या चाहत्यांकडून होत आहे. या चाहत्यांपैकी वकील इंद्रजीत चव्हाण यांना तर बच्चन यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान उपस्थित राहण्याची संधी मिळाली.
बच्चन यांना कोल्हापुरात आणणारच : " अमिताभ बच्चन यांच्याबरोबर मुंबईत भेट झाली. तेव्हा ते कोल्हापूरबद्दल आणि करवीर निवासिनी आई अंबाबाईबद्दल भरभरून बोलले," असं इंद्रजीत चव्हाण यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधताना सांगितलं. मराठी चित्रपट सृष्टीचं माहेरघर असलेल्या कोल्हापूरला मी आणि पत्नी जया आवर्जून भेट देणार, असा शब्दही अमिताभ बच्चन यांनी दिलाय. त्यामुळं अमिताभ बच्चन यांना कोल्हापुरात आणणारच असा निश्चय बच्चन यांचे चाहते वकील इंद्रजीत चव्हाण, सूर्यकांत पाटील बुधीहाळकर, राजन गुणे, दिनेश माळी, संजय रणदिवे, स्मिता खामकर, उद्योग निचिते, राजू जोशी, गिरीश सामंत, मंगेश शेटे, संतोष कुलकर्णी यांनी केलाय.
हेही वाचा -