सातारा : महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी स्टार प्रचारकांच्या सभा होणार असल्यानं आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडणार आहे. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शुक्रवारी ८ नोव्हेंबर रोजी कराड दौऱ्यावर येत आहेत. माजी मुख्यमंत्री तथा महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मैदानात अमित शाह प्रचाराची राळ उडवून देणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीकडून त्यांना उत्तर देण्याची जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना प्रचारासाठी महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कराड दक्षिणमध्ये अमित शाहांची सभा : कराड दक्षिणमधील महायुतीचे उमेदवार डॉ अतुल भोसले यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शुक्रवारी कराड दौऱ्यावर येणार आहेत. ज्या ठिकाणी मविआचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला, त्या कराड तालुक्यातील विंग या गावात त्यांची जाहीर सभा होणार आहे. अमित शाहांचा दौरा महायुतीच्या कार्यकर्त्यांना चार्ज करणारा ठरणार आहे.
मविआकडून अरविंद केजरीवालांना आणण्याचे प्रयत्न : महाविकास आघाडीकडून आम आदमी पार्टीचे नेते तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना प्रचारासाठी महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या एका ज्येष्ठ नेत्याकडून अरविंद केजरीवालांना संपर्कही करण्यात आला आहे. ते प्रचारासाठी महाराष्ट्रात आल्यास प्रचाराची राळ उडणार आहे. तसेच महाविकास आघाडीला त्यांच्या सभांचा फायदा देखील होणार आहे, अशी आशा महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे.
खासदार संजय सिंह यांना देखील पसंती : अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांना देखील प्रचारासाठी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अरविंद केजरीवाल येऊ शकले नाहीत, तर खासदार संजय सिंह यांच्या सभा घेण्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांची साताऱ्यातील प्रचार सभा त्यांनी गाजवली होती. त्यामुळे खासदार संजय सिंह यांनाही स्टार प्रचारक म्हणून पसंती मिळत आहे.
हेही वाचा :