अहमदनगर MLA Nilesh Lanke : पारनेर मतदारसंघातील अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे. विशेष म्हणजे आमदार लंके यांनी अहमदनगर शहरात शिवपुत्र संभाजी महाराज महानाट्य हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे तसंच काँग्रेस पक्षाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी महानाट्य म्हटल्यावर नाटक घडतच असतं असं सूचक विधान केल्याने निलेश लंके शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चांना बळ मिळालं आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा : लोकसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर लंके हे त्यांच्या पत्नी राणी लंके यांना भाजपाचे खासदार सुजय विखे यांना टक्कर देण्यासाठी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा होत असतानाच, शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी देखील लंकेंबाबत केलेलं सूचक विधान हे निलेश लंके शरद पवार यांच्या वाटेवर असल्याची शक्यता आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार लंके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली होती. त्यात त्यांनी पारनेर मतदारसंघातून जोरदार विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर निलेश लंके यांनी अजित पवारांची सोबत धरली. मात्र, लोकसभा निवडणूक जवळ येत आहे, तसं लंके यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे.
कार्यकर्त्यांनी फोटो वापरले असतील : पारनेर मतदार संघामध्ये विविध विकास कामाच्या उद्घाटनाप्रसंगी सोशल मीडियावर जाहीर करण्यात आलेल्या जाहिरनाम्यावर निलेश लंके यांच्यासोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा देखील फोटो वापरण्यात आला आहे. एवढंच, नव्हे तर त्यांनी आयोजित केलेल्या शिवपुत्र संभाजी महाराज महानाट्य प्रवेश द्वारावर शरद पवारांसोबत असलेला फोटो त्यांनी लावला. त्यामुळे लंके हे लोकसभेसाठी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचं दिसत असून फोटो हे मी लावत नसून कार्यकर्त्याने लावला असेल असं उत्तर लंके यांनी दिलं आहे.
तिकीट कोणाला मिळणार : खरंतर निलेश लंके यांनी लोकसभेसाठी पत्नी रानी लंके यांना पुढं केलं आहे. राणी लंके यांनी देखील काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं होतं. तर, दुसरीकडे निलेश लंके यांनी देखील वरिष्ठ जी जबाबदारी देतील ती पार पाडू मग ती लोकसभा निवडणूक असेल तरी ती जबाबदारी पार पाडू अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मात्र, लंके जरी इच्छुक असले तरी उमेदवारी घेणार कोणाकडून हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लंके यांच्या सध्याच्या डबल रोल भूमिकेवर भाजपाचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार राष्ट्रवादी बाबत त्यांनी बोलण्यास नकार दिला. मात्र, लोकसभेबाबत बोलताना सांगितलं की, अजित पवार हे महायुतीत आहेत. त्यामुळे तिकीट कोणाला मिळणार यावर, वरिष्ठ जे देतील तो आदेश पाळू अशी प्रतिक्रिया सुजय विखे यांनी दिली आहे.
हेही वाचा :
3 खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी, तक्रार दाखल