मुंबई Umesh Patil About CM Post : महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यातील अकरा लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान होतं आहे. प्रचार काळात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळाले आहेत. तर दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गटातील एकमेकांबाबत दावे-प्रतिदावे थांबायचं नाव घेत नाही. संजय राऊत आज माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे नको. आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, आताचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांत आधी विरोध केला होता, असा दावा केलाय. याला अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
त्या वेळच्या परिस्थितीचे आम्ही साक्षीदार - उमेश पाटील : "महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेच्या वेळेला मुख्यमंत्री पदाकरिता उद्धव ठाकरे यांचं नाव तिन्ही पक्षांच्या बैठकीमध्ये शरद पवार यांनी हात वर करुन जाहीर केलं. त्यावेळी शरद पवार यांनी असं सांगितलं की, मुख्यमंत्री पदावर स्वतः विराजमान होण्यास उद्धव ठाकरे यांचा विरोध होता. आता संजय राऊत असं सांगत आहे की, मुख्यमंत्री पदाच्या नावासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाला सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एका अर्थानं विरोध केला. म्हणून नाईलाजानं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद स्वीकारावं अशा प्रकारची धादांत खोटी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत देत आहेत. वास्तविक त्यावेळची माहिती आणि त्यावेळच्या परिस्थितीचे आम्ही साक्षीदार असल्याचं अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी म्हटलं. सगळ्याच गोष्टी राजकारणात जाहीर केल्या जात नसतात, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की एकनाथ शिंदे यांच्या नावाला स्वतः संजय राऊत यांचाच विरोध होता," असा आरोप उमेश पाटील यांनी केला आहे.
मुख्यमंत्री पदासाठी 'या' नावांचीही होती चर्चा : "संजय राऊत आणि आमचे त्यावेळचे पक्षाचे वरिष्ठ नेते यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी सुरुवातीच्या अडीच वर्षांसाठी उद्धव ठाकरे असतील आणि अडीच वर्षानंतर एक वेगळं नाव मुख्यमंत्री पदाकरिता या दोघांमध्ये ठरलं होतं. ते नाव अजित पवार, दिलीप वळसे पाटील, प्रफुल पटेल, सुनील तटकरे यासारख्या वरिष्ठ नेत्यांना देखील त्या नावाबद्दल माहिती दिली नव्हती. ही बाब गोपनीय ठेवली. अडीच वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री, परंतु अजित पवार यांच्या व्यतिरिक्त जे कोणी नाव आमच्या वरिष्ठांच्या डोक्यात होतं ते फक्त संजय राऊत आणि उद्धव ठाकरे आणि आमचे वरिष्ठ नेते यांच्यातच ठरलं होतं. या बाबतीमध्ये संजय राऊत यांना सर्व काही माहिती होतं," असा दावा उमेश पाटील यांनी केला. त्याबाबत त्यांनी खुलासा करावा, असं आव्हान देखील संजय राऊत यांना केलं आहे.
हेही वाचा :
- दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये स्फोट होणार असल्याचा मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन, अज्ञाताचा शोध सुरू - Mumbai Bomb Threat
- एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास भाजपासह अजित पवारांचा होता विरोध, संजय राऊत यांनी 'हे' सांगितलं कारण - Sanjay Raut news
- "अजित पवारांमध्ये कोणते गुण कमी होते?"; शरद पवारांच्या 'त्या' दाव्यानंतर अमोल मिटकरींचा सवाल - Lok Sabha Election