मुंबई Air India Flight Meal News: एअर इंडिया विमान कंपनी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली. काही दिवसांपूर्वीच एअर इंडियाच्या नेवार्क जाणाऱ्या विमानात प्रवाशानं त्याला अर्धवट शिजलेले खाद्य पदार्थ आणि आसनदेखील अत्यंत घाणेरड्या अवस्थेत असल्याची तक्रार केली होती. एअर इंडियाच्या बंगळुरू ते सॅनफ्रॅन्सिस्को या उड्डाणात प्रवाशाला जेवणात ब्लेड सापडली.
प्रशासनानं मागीतली प्रवाशाची माफी: एअर इंडिया प्रशासनानं या प्रकाराची दखल घेत संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. त्यामध्ये प्रवाशाच्या जेवणात धातुची वस्तू सापडल्याच्या प्रकाराला प्रशासनानं दुजोरा दिला. एअर इंडियाचे ग्राहक सेवा विभागाचे मुख्य अधिकारी राजेश डोगरा यांनी या प्रकाराला दुजोरा देत ही वस्तू एअर इंडियाच्या कॅटरिंग भागीदाराने वापरलेल्या भाजीपाला प्रोसेसिंग मशीनमधील असल्याचं स्पष्ट केलं. वस्तूस्थिती स्वीकारत एअर इंडियानं प्रवाशाची माफी मागितली. प्रवाशांना देऊ इच्छितो त्या दर्जाची ही सेवा नाही, याची कबुली एअर इंडियातर्फे देण्यात आली.
नेमकं काय घडलं: सुमारे आठवडाभरापूर्वी एअर इंडियाच्या फ्लाईट क्रमांक १७५ ने बंगळुरू ते सॅनफ्रॅन्सिस्को प्रवास करणाऱ्या मँथुरेस पॉल या प्रवाशाला विमानात देण्यात आलेल्या जेवणातील चाटमध्ये ब्लेड सापडलं होतं. त्याची तक्रार प्रवाशानं सोशल मीडियावर एअर इंडियाकडे केली होती. जेवणात देण्यात आलेले बटाटा आणि अंजीरचे चाट खाल्ल्यानंतर त्याला तोंडात काही वेगळं असल्याचं जाणवलं. त्यामुळे त्यानं घास तोंडातून बाहेर काढून पाहिला असता त्यामध्ये ब्लेड दिसलं. या ब्लेडमुळे नुकसान होण्यापासून तो थोडक्यात बचावला.
लहान मुलाचा गेला असता जीव: आपल्या जागी एखादे लहान मुलं असतं तर त्यानं ते जेवण तसच खाल्लं असतं. तर त्याच्यासोबत कदाचित मोठी समस्या उद्भवली असती. कदाचित ब्लेड पोटात जाणं त्याच्यासाठी प्राणघातक ठरलं असतं, अशी त्यानं भीती व्यक्त केली. एकेकाळी एअर इंडियाच्या राजेशाही आदरतिथ्यासाठी ओळखली जात असे. मात्र, आता एअर इंडियाच्या जेवणात ब्लेड सापडल्यानं प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
हेही वाचा