छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Chalo Mumbai Tiranga Rally : आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराज आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई का होत नाही? याचा जाब विचारण्यासाठी एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मुंबईकडं प्रस्थान केलंय. राज्यात मुद्दाम विशिष्ट समाजाला लक्ष्य केलं जातंय. तरीही सरकार कुठलीच कारवाई होत नाही. त्यामुळं मुख्यमंत्र्यांना कायदा कळावा म्हणून त्यांनी संविधानाची प्रत देण्यासाठी मुंबईला जात असल्याचं जलील म्हणाले.
समृद्धी महामार्ग जाम : इम्तियाज जलील यांच्यासह आज (22 सप्टेंबर) शेकडो वाहनांतून लोक समृद्धी महामार्गावरुन मुंबईच्या दिशेनं रवाना झाली. सावंगी टोल नाका पार करताना समृद्धी महामार्गाचा रस्ता जाम झाला होता. वैजापूरपर्यंत हा महामार्ग जाम झाल्यानं अनेकांना अडचणीचा सामना करावा लागला. "आम्ही कुठल्याही परिस्थितीत मुंबईला पोहोचू. कुठं जाणार हे माहित नाही. मात्र, सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही," असा इशारा जलील यांनी दिलाय.
पक्ष म्हणून नाही तर समाज म्हणून जातोय : यावेळी जलील म्हणाले की, "आम्हाला राज्य सरकारकडून अपेक्षा होती. संविधानाप्रमाणे देश चालतो असं वाटत होतं. मात्र, तसं होताना दिसत नाही. त्यानंतर कोर्टाकडून अपेक्षा होती. तिथंही न्याय मिळाला नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांना संविधानाची प्रत द्यायला आम्ही मुंबईला जातोय. रामगिरी महाराजांविरोधात 60 तक्रारी देण्यात आल्या तरीसुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही. अगोदर आम्ही गंगापूर मार्गानं जाणार होतो. मात्र, तिथंही घाणेरडं राजकारण सुरू आहे. वाद नको म्हणून आम्ही मार्ग बदलला. आम्ही कुठलाही पक्ष म्हणून नाही तर समाज म्हणून मुंबईला जातोय."
राणेंवर कारवाई का नाही? : पुढं ते म्हणाले, "नितेश राणेंसारखे लोक प्रार्थनास्थळात येऊन मारू म्हणतात. पोलीस गप्प बसतात. त्यावर कारवाई होत नसेल तर मी कुठलाही झेंडा न वापरता जातोय. मी सगळ्या पक्षाच्या लोकांना पत्र पाठवून येण्याचं आवाहन केलंय. नितेश राणे जे बोलतो त्याला बोलण्याची मुभा आहे का? मला न्याय वेगळा आणि नितेशला न्याय वेगळा असं का?", असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा -