अहिल्यानगर : शेतकऱ्यांना सातत्यानं विविध संकटांचा सामना करावा लागतो. कधी अती पावसामुळं तर कधी पाऊसच न पडल्यानं शेतकरी अडचणीत येतो. अहिल्यानगर डोळासणे येथील पोखरकर बंधूंनी यशस्वी शेती करत मोठं यश मिळवलं आहे. खडकाळ माळरान, सातत्यानं पाणी टंचाई, त्यातही नैसर्गिक संकटे अशा कठीण परिस्थितींचा सामना करत रत्नाकर पोखरकर आणि प्रकाश पोखरकर या बंधूंनी यशस्वी शेती केली. पाण्याची कमतरता असताना देखील जवळपास सात एकरावर कांद्याच्या पातीतून भरघोस उत्पन्न घेतलं आहे. त्यामुळं त्यांची ही यशोगाथा इतर शेतकर्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरणारी आहे.
दुष्काळी भाग असतानाही केली यशस्वी शेती : संगमनेर तालुक्यातील डोळासणे येथील शेती ही निसर्गावरच अवलंबून असते. या ठिकाणी भरपूर पाऊस झाला तरच खरीपाची पिकं येत असतात, अन्यथा शेतकर्यांना दुष्काळाशी दोन हात करावे लागतात. अशा अवघड परिस्थितीत येथील शेतकरी आपली शेती करत असतात. रत्नाकर पोखरकर आणि प्रकाश पोखरकर हे दोघे बंधू सातत्यानं शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग राबवत असतात. विशेष बाब म्हणजे हा संपूर्ण परिसर दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात आहे. कठीण परिस्थितीचा सामना करत पोखरकर बंधूंनी आपली शेती यशस्वी करून दाखवली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी सात एकर क्षेत्रात कांद्याची शेती करण्याचा निर्णय घेतला. कांद्याला चांगला बाजारभाव असल्यामुळं चांगला नफा होईल, अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र, सततच्या हवामान बदलामुळं कांदा शेतीला चांगलाच फटका बसला होता. तरीही न डगमगता या बंधूंनी कांद्याची चांगली काळजी घेतली.
कांद्याच्या पातीतून भरघोस उत्पन्न : पुढे हळूहळू कांद्याची पातही अतिशय चांगली झाली. पुढे आणखी दोन महिने कांद्याचं पीक सांभाळण्याऐवजी पात विकण्याचा निर्णय या बंधूंनी घेतला. यानंतर नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील व्यापारी डोळासणे येथे येवून कांद्याची पात पाहून गेला. संपूर्ण कांद्याची पात त्यानं घेतली. जवळपास पंधरा दिवस महिला शेतातील कांद्याची पात काढत होत्या. कांद्याच्या पातीतून पोखरकर बंधूंना भरघोस उत्पन्न मिळालं आहे. दरम्यान पोखरकर बंधू सातत्यानं शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग राबवत असतात. पावसाळ्यात बोअरवेलच्या माध्यमातून शेततळ्यात पाणी सोडून शेततळी तुडुंब भरून घेत असतात. यानंतर शेततळ्यातील पाण्याचं उत्तम नियोजन करून ते वर्षभर पिकं घेत असतात. नैसर्गिक संकटांवरही सातत्यानं मात करून त्यांनी आपली शेती यशस्वी करून दाखवली आहे.
हेही वाचा