मुंबई Chhagan Bhujbal : लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाराष्ट्रात मोठा फटका बसलाय. राज्यसभेसाठी निवडणूक होणार आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ देखील राज्यसभेसाठी इच्छुक होते. पक्षाने घेतलेले निर्णय मान्य करावे लागतात. तसंच आपण जे ठरवलं ते होतंच असं नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी माध्यमांना दिली आहे.
सुनेत्रा पवार यांच्या नावाचा निर्णय सर्वानुमते : राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काल मंत्रिमंडळातील सदस्य आणि सुनील तटकरे, प्रफुल पटेल अशी आमची सगळ्यांची बैठक झाली. त्यात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचं निश्चित झालं. मी देखील इच्छुक होतो. त्याबरोबर आनंद परांजपे, बाबा सिद्दिकी बरेचजण इच्छुक होते. माध्यमातून 13 जण इच्छुक असल्याचं समजतं; पण तेरा जणांना उभं करणं शक्य आहे का?सगळ्यांनी निर्णय घेतला की त्यांना उभं करायचं. पक्षाचा निर्णय हा सर्वांना मान्य करावा लागतो आणि आम्ही तो निर्णय घेतलेला आहे. त्याप्रमाणे सुनेत्रा पवार यांच्या नावाचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे.
विरोधीपक्ष अर्ज दाखल करणार नसल्याचा विश्वास : पक्षात दोन गट पडल्याच्या चर्चा असून छगन भुजबळ नाराज असल्याचं देखील बोललं जात आहे. यावर छगन भुजबळ म्हणाले की, तसं काहीही नाही. आपण नाराज नाही. सगळ्यांनी बसून हा निर्णय घ्यायचा असतो, तो घेतला आहे. तसंच प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होते असं नाही, असंही भुजबळ म्हणाले. उमेदवारी घोषित करण्यासाठी वेळ लागला, यावर भुजबळ म्हणाले की, वेळ पाहून प्रचार करायला थोडंच जायचं. या निवडणूक प्रक्रियेत सगळे आमदार मतदान करणार आहेत. महायुतीकडे तितके उमेदवार आहेत. विरोधी पक्ष काही अर्ज दाखल करणार नाही, असा विश्वास भुजबळ यांनी बोलून दाखवला.
कालच्या बैठकीला होतो : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार, तटकरे आणि पटेल यांनी स्वतःची प्रॉपर्टी असल्यासारखा पक्ष चालवत असल्याचा आरोप केला आहे. यामध्ये डावललं जात असल्याचंही त्यांनी बोललं होतं. यावर छगन भुजबळ म्हणाले की, कालच्या संध्याकाळच्या बैठकीला आपण उपस्थित होतो. बघा मग मला कुठे डावडलं, असा प्रतिसवाल त्यांनी माध्यमांना विचारला.
जरांगे यांनी सरकारला वेळ द्यावा : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासंदर्भात छगन भुजबळ म्हणाले की, त्यांनी आता थांबायला हवं. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात सरकार सकारात्मक विचार करत आहे. आता लोकसभा निवडणूक आटोपली आहे. सगळे नेते मोकळे झाले आहेत. त्यामुळे जरांगे यांनी सरकारला वेळ द्यायला हवा. जरांगे पाटील यांच्या टीकेची आपल्याला सवय झाली आहे. अनेक वर्ष छगन भुजबळ टीका सहन करत आहे, असं भुजबळ म्हणाले.
शरद पवार बरोबर बोलतायत : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी 4 महिन्यात सरकार बदलणार असल्याची भाषा बोलली आहे. यावर छगन भुजबळ म्हणाले की, आम्ही पण तेच म्हणतोय की युतीतल्या पक्षांनी एकत्र बसून तिकीट वाटपाचा प्रश्न सोडवला पाहिजे. लवकरात लवकर तिकीट वाटप केलं पाहिजे. शरद पवारांनी प्रचार सुरू केला आहे. लवकरात लवकर जागावाटप करा, 80 द्या 90 द्या काय करायचं ते करा. बिग ब्रदर, छोटा ब्रदर मधला ब्रदर काय ते ठरवा. नाहीतर आपण पुन्हा अडचणीत येऊ. एवढंच माझं म्हणणं असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
मी अपक्ष नाही : भाजपाचे पियुष गोयल लोकसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी आपण विनंती करणार आहात का? यावर छगन भुजबळ म्हणाले की, पक्षाने घेतलेला निर्णय सर्वांना मान्य करावा लागतो. मी अपक्ष नाही, जो आपल्या मनाप्रमाणे निर्णय घेऊन अंमलात आणेल. पक्ष जे ठरवेल त्याप्रमाणे काम करावं लागतं, असं भुजबळ म्हणाले. आरएसएसचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरने अनेकांवरती टीका केली आहे. काँग्रेसला देखील सोडलं नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार बरोबर आहे. मात्र, महाराष्ट्रात नाही तर देशात देखील धक्कादायक निकाल आले आहेत. म्हणून तर नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांना घेऊन सरकार स्थापन करावं लागलं असल्याचं भुजबळ म्हणाले.
हेही वाचा: