छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - सणांच्या दिवसात भेसळयुक्त खाद्यपदार्थ बाजारात आणले जातात. कमी वेळेत पैसे कमावण्यासाठी काही व्यापारी सर्वसामान्य ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करतात. असाच एक प्रकार छत्रपती संभाजीनगरात उघडकीस आणण्यात पोलीस विभागाला यश मिळाले. दिव्यांश मिल्क अँड डेअरी प्रोडक्ट या ठिकाणी सायबर पोलीस ठाणे यांनी छापा मारून 71 हजारांचा खवा जप्त केलाय. संशयास्पद, भेसळयुक्त खवा, बर्फी जप्त करून त्याचे नमुने काढून तपासणीकरिता अन्न आणि औषध प्रशासन प्रयोगशाळेत पाठविला असून, पुढील कायदेशीर कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
भेसळयुक्त खवा जप्त : सर्वत्र हिंदू धर्मीय नागरिकांचा महत्त्वाचा असा दिवाळी सण सुरू आहे. या सणामध्ये स्वस्त साहित्यांचा वापर करून त्याद्वारे भेसळयुक्त खवा तयार करून त्याची स्थानिक बाजारपेठेत विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानिया कॉलनी अन् मिटमिटा परिसरात दिव्यांश मिल्क अँड डेअरी प्रोडक्ट या ठिकाणी सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून पाहणी केली. त्या ठिकाणी मिल्क पावडर, वनस्पती तूप, खाद्यतेल, खातासोडा यांचा वापर करून भेसळयुक्त खवा तयार करत असल्याचं आढळून आलं. स्वस्त आणि झटपट प्रक्रियेद्वारे मोठ्या प्रमाणावर खव्याचे उत्पादन करून तो दुधापासून बनविलेला शुद्ध खवा असल्याचं भासवून त्याची मोठ्या प्रमाणावर विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.
भेसळयुक्त पदार्थ तयार केल्याबाबत गुन्हा दाखल : कमी वेळेत पैसे कमावण्यासाठी काही व्यावसायिक सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ करतात. मिटमिटा भागातील दिव्यांश मिल्क अँड डेअरी प्रोडक्ट येथेदेखील असाच प्रकार सुरू होता. पोलिसांनी झडती घेत भेसळयुक्त बर्फी आणि खवा असा एकूण 425 किलो ग्रॅम वजनाचा 71,910/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या डेअरीचा मालक गिरेन सिंग, बच्चनलाल सिंग यांच्यावर यापूर्वीदेखील भेसळयुक्त पदार्थ तयार केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुसऱ्यांदा अशाच प्रकारचा गुन्हा उघड झाल्याने त्याच्याविरोधात कडक कारवाई करणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिलेच. तर डेअरीमधील इतर पदार्थांबाबत अन्न आणि औषधी प्रशासन तपासणी करून त्याबाबत पुढील कारवाई करणार आहे.
हेही वाचा -