ठाणे Fraudster Arrested In Thane : आमदाराचा नातेवाईक आहे, असं सांगून भोळ्याभाबड्या नातेवाईकांची फसवणूक करणाऱ्या भामट्यास ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. खळबळजनक बाब म्हणजे, अनेक महिने मनसे आमदार पाटील यांच्या नावाने या तोतया नातेवाईकाने लबाड्या करून ५० हून अधिक गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. विजय दत्ताराम तांंबे (५५, रा. शेलार गाव, भिवंडी) असं आरोपीचं नाव आहे.
थाप मारून मुद्देमाल लंपास : विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी सांगितले, गेल्या महिन्यात डोंबिवलीतील रेल्वे मैदान भागातील सोसायटीत राहणारे सेवानिवृत्त गणेश कुबल महात्मा फुले रस्त्यावरील बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते. पैसे काढल्यानंतर ते गुप्ते रस्त्यावर खरेदीसाठी गेले. गोपी माॅल भागातील रस्त्याने पायी घरी चालले होते. तेवढ्यात त्यांना एका इसमाने हाक मारून थांबवले. अनोळखी इसमाने मला ओळखले का? मी आमदार राजू पाटील यांचा भाचा. आपण एका बैठकीत भेटलो होतो, असं बोलून कुबल यांच्याशी इसमाने थाप मारली. आपण तुम्हाला ओळखूनही तुम्ही मला ओळखत नाहीत याचं आश्चर्य वाटतं, असं बोलून कुबल यांचा विश्वास इसमानं संपादन केला. बोलण्याच्या गडबडीत इसमानं कुबल यांना भुरळ घालून त्यांच्या खिशातील आठ हजार रुपये रोख, गळ्यातील सोनसाखळी असा ऐवज काढून घेतला.
आरोपीचा शोध केला सुरू : तुम्ही वृद्ध आहात. कोणी पण तुमचा मुद्देमाल लुटेल असं बोलून इसमाने रोख रक्कम, सोनसाखळी, ऐवज एका रुमालात गुंडाळून तो कुबल यांच्या विजारीच्या मागील खिशात ठेवल्याचा भास निर्माण केला. या इसमाच्या जवळ अन्य एक इसम दूरवर उभा होता. इसमाने कुबल यांना आता तुम्ही घरी जा. ओळख ठेवा, असं बोलून कुबल यांना जाण्याचा इशारा केला. कुबल काही अंतर पुढे गेल्यावर त्यांनी मागील विजारीच्या खिशात पैसे, सोनसाखळीचे पुडके नव्हते. ते पुन्हा माघारी आले तोपर्यंत तो इसम आणि त्याचा साथीदार पुडके घेऊन पसार झाले होते. कुबल यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी गोपी माॅल भागातील सीसीटीव्ही चित्रण तपासून आरोपीची ओळख पटवून त्याचा शोध सुरू केला होता.
आरोपीकडून गुन्ह्याची कबुली : वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार, पोलीस निरीक्षक गहिनाथ गमे, साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक दीपकुमार भवर यांच्या मार्गदर्शनाखालील तपास पथकाला आरोपी विजय तांंबे नवी मुंबई भागात मंगळवारी येणार आहे अशी गुप्त माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगळवारी नवी मुंबईत सापळा लावून आरोपी तांंबे याला अटक केली. त्याने ठाणे, मुंबई परिसरात अशाप्रकारे ५० हून अधिक गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
हेही वाचा :
- एनसीबीची मोठी कारवाई! ड्रग्ज तस्कराला लॉजवरून अटक; 10 कोटींचं 5 किलो एमडी ड्रग्ज जप्त - Drug Smuggler Arrested
- पूजा खेडकर यांना यूपीएससीचा दणका : खोटं प्रमाणपत्र प्रकरणी दाखल केला खटला, बजावली कारणं दाखवा नोटीस - UPSC Issue Notice To Pooja Khedkar
- वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल - Pooja Khedkar