मुंबई Abhishek Ghosalkar Murder Case : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर खून प्रकरणातील आरोपी अमरिंदर मिश्रा हा मॉरिस नोरोन्हा याचा अंगरक्षक होता आणि त्याच्याकडे बेकायदेशीर शस्त्र सापडलं आहे. (Maurice Noronha) याच शस्त्रानं मॉरिसनं माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा खून केल्याचं पोलिसांनी 'एफआयआर'मध्ये नमूद केलेलं आहे.
अमरिंदरला 13 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी : शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा दोन दिवसांपूर्वी खून झाला होता. त्यांना मारणाऱ्या आणि नंतर स्वतः आत्महत्या करणाऱ्या मॉरिस नोरोन्हा यानं गोळीबार करण्याचं थेट प्रक्षेपण फेसबुकवर प्रसारित केलं होतं. त्या घटनेत अभिषेक घोसाळकर यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. गोळी घालणाऱ्या मॉरिसनं देखील स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली; मात्र आरोपी मॉरिसचा अंगरक्षक अमरिंदर मिश्राला पोलिसांनी बेकायदेशीर शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत अटक केली आणि मुंबईच्या किल्ला कोर्ट येथे न्यायाधीश लक्ष्मीकांत एन पाढेन यांच्यासमोर हजर केलं. त्यावेळेला न्यायालयानं त्याला 13 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे.
कोण आहे अमरिंदर मिश्रा? अभिषेक घोसाळकर यांच्यावर ज्या बंदुकीतून गोळीबार झाला ती बंदूक याच अमरिंदर मिश्राची आहे. त्याच्याकडे बेकायदेशीररित्या हे हत्यार असल्याचं पोलीस तपासात आढळलेलं आहे. तो मागील पाच महिन्यांपासून मॉरिसचा अंगरक्षक म्हणून काम करत होता. त्यामुळं पोलिसांना त्याच्या संपूर्ण गुन्हेगारी पार्श्वभूमीतून त्याचा या खुनामागं कसा आणि कोणता संबंध आहे, हे जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी वकिलांनी पोलिसांच्यावतीनं न्यायालयासमोर आरोपी अमरिंदरच्या पोलीस कोठडीसाठी जोरदार युक्तिवाद केला. त्यामुळं न्यायाधीशांनी त्याला 13 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. अमरिंदर मिश्रा मूळचा उत्तर प्रदेशचा असल्याचं समजतंय. याआधी त्याच्यावर विविध गुन्हे दाखल असून आणि आरोपसुद्धा ठेवण्यात आले होते; पण 28 सप्टेंबर 2019 रोजी पुराव्याअभावी त्याची निर्दोष मुक्तता झाली.
काय आहे बचाव पक्षाच्या वकिलाचं म्हणणं? आरोपी अमरिंदर मिश्राच्या वकील रेखा जैस्वाल यांचं म्हणणं आहे की, ''मृत अभिषेक घोसाळकर यांना गोळी मारणारा मॉरिस नोरोन्हा याचा तो केवळ अंगरक्षक आहे; परंतु त्याच्याकडे अधिकृत बंदूकीचा परवाना देखील आहे. तसंच या घटनेमध्ये त्याचा कोणताही, कसलाही संबंध नाही. गेल्या काही महिन्यांपासूनच तो मॉरिसचा अंगरक्षक म्हणून काम करत होता.
अमरिंदरची 'या' आरोपातूनही मुक्तता : अमरिंदर मिश्रावर त्याची पत्नी अपर्णा गुंजा हिला मारण्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला होता; मात्र 28 सप्टेंबर 2019 रोजी दिल्लीच्या साकेत न्यायालयानं त्याला पुराव्याच्या अभावी या गंभीर गुन्ह्यातून निर्दोष मुक्त केलेलं आहे.
हेही वाचा: