ठाणे Aaditya Thackeray : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होम ग्राऊंडवर आमदार आदित्य ठाकरे यांनी रणशिंग फुंकलं आहे. यावेळी त्यांनी निवडणुका, पळवापळवी, आरोप-प्रत्यारोप प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपाचा चांगलाच समाचार घेतला आहे. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेना (ठाकरे गट) पुन्हा ठाणे जिंकल्याशिवाय शांत बसणार नाही. कारण गद्दार गेले तरी, मतदार आमच्यासोबत आहेत. यापूर्वी नगरविकास खात्यासाठी एकनाथ शिंदे 'मातोश्री'वर येऊन रडले होतं, असा खळबळजनक दावा, आदित्य ठाकरेंनी केला आहे.
मुख्यमंत्री रात्री शेतात नेमकं काय पिकवतात?: "सध्याचे मुख्यमंत्री म्हणतात, आम्हाला शेतीबद्दल काय माहिती आहे? आदित्यचा जन्म आता झाला, त्याला शेतीची काय माहिती? पण त्यांच्या रात्रीच्या शेतीबद्दल आम्हाला माहिती नाही. मुख्यमंत्री रात्री शेतात नेमकं काय पिकवतात? त्यांच्या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळं ते दोन हेलिकॉप्टर घेऊन शेतात उतरतात. गेल्या काही वर्षात गावात त्यांची जागा तसंच बंगले किती वाढले? हेही महत्त्वाचं असल्याचा टोला त्यांनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे.
हिंमत असेल तर राजीनामा द्या : "सध्याच्या सरकारनं राज्यात एकही नवीन उद्योग आणलेला नाही. केवळ इतरांचे पक्ष फोडण्याचं काम ते करत आहे. ज्यांना आम्ही खूप काही दिलं, त्यांनी निर्लज्जपणे पक्ष फोडला. तरीदेखील त्यांना चांगलं काम करता येत नाहीय. त्यांच्यात हिंमत असेल तर, त्यांनी राजीनामा द्याला हवा. मी तुमच्या मतदारसंघात येऊन लढेन," असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना दिलंय.
- मुख्यमंत्र्यांना आव्हान : सध्या एक टीम फक्त पक्ष फोडण्यात व्यस्त आहे. त्यांना दुसरं काहीही काम उरलेलं नाही. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यास मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवेल, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याना आव्हान दिलं आहे. यापूर्वीही त्यांनी एकनाथ शिंदे यांना वरळीतून लढण्याचं आव्हान दिलं होतं.
हे वाचलंत का :