नवी मुंबई Ganesh Ghol temple rape case : नवी मुंबईतील एका विवाहितेची डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंदिर परिसरात बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. विवाहित महिला घरगुती वादाला कंटाळली होती. रोजच्या भांडणाचा ताण कमी करण्यासाठी महिला डायघरजवळील शीळ फाटा गणेश घोळ मंदिरात गेली होती. मात्र, दुर्दैवी महिलेवर मंदिराची देखभाल करणाऱ्या तीन पूजाऱ्यांनीच बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. "आमच्या मुलीवर सासरच्यांनी अत्याचार केले नसते, तर आमची मुलगी घराबाहेर पडली नसती. त्यामुळं आमच्या मुलीच्या बलात्काराला तिचे सासरचे लोक देखील जबाबदार" असल्याचा आरोप मयत महिलेच्या वडिलांनी केला आहे. याबाबत त्यांनी नवी मुंबईतील एनआरआय पोलीस ठाण्यात महिलेचा पती, सासू, नंदा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
सासरचा महिलेला त्रास : विवाहित महिला नवी मुंबईतील परिसतील रहिवासी असून 9 मे 2018 रोजी तिचा विवाह झाला होता. लग्न झाल्यापासून सासरच्यांनी तिचा छळ सुरू केला. सुरुवातीला मूल होत नाही म्हणून तिचा मानसिक छळ केला जात होता. त्यानंतर माहेरहून 10 लाख रुपये आणण्यासाठी सासरच्यांनी तिचा छळ केला. त्यावेळी पीडितेच्या वडिलांनी कर्ज काढून पतीला 10 लाख रुपये दिले. मात्र, त्यानंतरही त्यानं पीडितेच्या मयत जोडीदाराचा शारीरिक, मानसिक छळ सुरूच ठेवला.
त्रासाला कंटाळून विवाहितेनं सोडलं घर : सासरकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून मयत विवाहिता 6 जुलै रोजी सकाळी 6.30 वाजता घरातून निघून गेली. पीडितेच्या परिस्थितीचा फायदा घेत तिच्यावर शिळफाटा येथील गणेश घोळ मंदिराच्या पुजाऱ्यांनी बलात्कार करुन तिची हत्या केली होती. पीडिता घरातून निघून गेल्याचं लक्षात आल्यानंतर तिचा शोध घेण्यात आला. मात्र ती आढळून आली नाही. दोन दिवसानंतर तिचा मृतदेह गणेश घोळ मंदिराच्या पाठीमागील डोंगरात आढळून आला.
न्याय मिळवून देण्यासाठी राजकीय पक्षांचा पुढाकार : विवाहितेच्या हत्येनंतर त्याचे पडसाद नवी मुंबईत सर्वत्र उमटत आहेत. महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी आता सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षांनीही पुढाकार घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सोमवारी परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांना निवेदन देऊन या प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. तसंच शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे (उबाठा) यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनीही पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेऊन आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
'हे' वाचलंत का :
मंदिराच्या पुजाऱ्यांनी महिलेवर सामूहिक बलात्कार करून केली हत्या; तिघांना अटक - gang rape