ठाणे Sexually assault : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. गेल्या सात महिन्यात २३३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्यात, त्यात 'पोक्सो' कायद्यानुसार गुन्हे दाखल करून नराधमांना अटक केली. खळबळजनक बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी बदलापूर मधील एका शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाला होता. या घटनेनं संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असताना अंगणात खेळत असलेल्या २ वर्षीय चिमुकलीचं अपहरण करुन निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर ३५ वर्षीय नराधमानं लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
अपहरणासह लैंगिक अत्याचार - याप्रकरणी कल्याण ग्रामीण तालुका पोलीस ठाण्यात अपहरणसह लैंगिक अत्याचार आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कल्याण तालुक्यातील एका गावात पीडित दोन वर्षाची चिमुरडी कुटुंबासह राहाते. तर ३५ वर्षीय नराधम आरोपी हा याच भागात राहतो. त्यातच पीडित चिमुकली गुरुवारच्या दिवशी दुपारच्या सुमारास घराबाहेरील अंगणात खेळत होती. त्याच सुमारास तिथे हा नराधम आला. त्यानं पीडितेचं अंगणातून अपहरण करत नजीकच्या निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
धक्कादायक प्रकार - अत्याचारानंतर नराधम घटनास्थळावरच चिमुकलीला सोडून फरार झाला होता. दुसरीकडे नराधमाच्या लैंगिक अत्याचारामुळ वेदना असह्य झाल्यानंतर चिमुकली रडत रडत घरी आली. ती रडत असल्याचं पाहून आई-वडिलांनी तिला विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र लहान असल्यानं ती काहीच सांगू शकली नाही. त्यामुळं कुटुंबाला संशय आल्यानं चिमुकलीच्या अंगावर कुठे दुखापत झाली तर नसावी, असा संशय कुटुंबीयांना आला. त्यांनी तिची पाहणी केली असता घडलेला धक्कादायक प्रकार लक्षात आला.
नराधमावर गुन्हा दाखल - आई-वडिलांनी तातडीनं कल्याण ग्रामीण तालुका पोलिसात धाव घेत नराधमावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तपासाची चक्रं फिरवत नराधम आरोपीला आज ३१ ऑगस्टला (आज) पहाटेच्या सुमारास ताब्यात घेऊन अटक केली आहे. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्याशी संपर्क साधला असता, ३५ वर्षीय आरोपीचा शोध घेऊन त्याला कल्याण तालुक्यातील एका गावातून अटक केली आहे. आज (शनिवारी) दुपारच्या सुमारास त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आज दुपारी न्यायालयात हजर केलं असता यातील आरोपीला ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
ठाणे ठरतंय अल्पवयीन बालिकांसाठी धोक्याचं - पोलीस सूत्रांनी नाव न देण्याच्या अटीवर ईटीव्ही भारतला ठाणे जिल्ह्यातील अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांचा लेखाजोखाच मांडला. पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ठाणे शहर पोलीस आयुक्तांच्या हद्दीतील पाच पोलीस उपआयुक्त कार्यालयाच्या हद्दीत ३५ पोलीस ठाणी आहेत. या विविध पोलीस ठाण्यात गेल्या सात महिन्यात २३३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडून पोक्सो कायद्यानुसार गुन्हे दाखल करत आरोपी नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक कल्याण पोलीस परिमंडळ तीन मध्ये ६१ पोक्सोचे गुन्हे तर त्या खालोखाल उल्हासनगर पोलीस परिमंडळ ४ मध्ये ५५, भिवंडी परिमंडळ २ मध्ये ४८ तर ठाणे शहरातील १ आणि ५ या दोन्ही परिमंडळ ४३, आणि २६ असे गुन्हे दाखल असल्याची आकडेवारी दिली.
हेही वाचा..