मुंबई Devendra Fadnavis in Vidhansabha : राज्यात गेल्या दोन वर्षात राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे मेगाभरती सुरू केली आहे. यातून 77 हजार लोकांना आतापर्यंत नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. यापैकी 58,000 उमेदवार प्रत्यक्ष नोकरीवर रुजू झाले आहेत. उर्वरित 31 हजार लोकांना लवकरच नोकरी नियुक्तीपत्रे देण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
कोणत्या विभागात किती नोकऱ्या : देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, हा महाराष्ट्रातला रेकॉर्ड आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती झाली आहे. यात सगळे विभाग आहेत. म्हणजे गृह विभागात आत्तापर्यंत 17216 लोकांना नियुक्ती दिली आहे. वैद्यकीय शिक्षण मध्ये प्राध्यापकीय 794, अधिपरिचारिका 1650, तांत्रिक 434, सार्वजनिक बांधकाम विभागांमध्ये जवळपास अभियंता 405, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1344, कनिष्ठ अभियंता 584, सामान्य प्रशासन मध्ये जवळजवळ 2000 पदे भरलेली आहेत. महसूल विभागात जवळजवळ 2160, सार्वजनिक आरोग्य विभागात 1447 पदे भरलेली आहे. जलसंपदामध्ये 884, वनविभागात 644 पदे भरलेली आहेत.
अडीच वर्षात 1 लाख नोकऱ्या : एका सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात एक लाख पेक्षा जास्त भरती केली. त्या भरतीमध्येही एखादी गैरप्रकाराची घटना घडली असेल पण पारदर्शी पद्धतीनं ही भरती या सरकारनं करून दाखवलेली आहे. आमदार राजेश टोपे यांनी या भरतीसाठी असलेली अर्जाची 1000 रूपये असलेली किंमत कमी करावी, अशी मागणी केली. यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अर्जाची फी कमी करण्याबाबत सरकार नक्कीच विचार करेल. आम्ही त्यात काही करता येत असेल तर जरूर करू. सर्व विभागाची यादी माझ्याकडे आहे. टीसीएस आणि आयबीपीएस या दोन्ही संस्थांनी परीक्षा घेतल्या आहेत. आपल्याला कुठली गोष्ट लपवण्याचे कारण नाही. राज्य सरकार पारदर्शी पद्धतीनं आपलं काम करत आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
गट क कर्मचाऱ्यांच्या परीक्षाही एमपीएससी मार्फत : यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, लोकांच्या मागणीनूसार आता गट क संवर्गाच्या परिक्षाही एमपीएससीकडे वर्ग करण्यात येतील. त्यामुळं त्या परीक्षाही यापुढे एमपीएससी घेतील, असंही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा
- कंटेनर कुठून येतात-जातात हे वेळ आल्यावर सांगणार-एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा - Maharashtra politics
- धबधब्यात वाहून गेलेल्या पाच पर्यटकांपैकी तीन जणांचे मृतदेह सापडले; दोन जणांचा अजूनही शोध सुरुच - Lonavala waterfall mishap
- ''उद्धव ठाकरे, संजय राऊत हे काँग्रेस पक्षश्रेष्ठींपुढे लाचार'', अतुल भातखळकर यांची घणाघाती टीका - Atul Bhatkhalkar