ठाणे Minor Girl Rape Case Thane : एका 60 वर्षीय नराधमाने त्याच्या 25 वर्षीय प्रेयसीच्या मदतीनं 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील शांतीनगर भागात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीनं या घटनेचं मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रिकरण केलं. यानंतर तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीसुद्धा दिली. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचारासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी ६० वर्षीय नराधमाला अटक केली आहे; मात्र त्याची २५ वर्षीय प्रेयसी फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. गोपीनाथ गवळी असं अटक नराधमाचं नाव आहे.
प्रेयसीनं पकडलं अन् प्रियकराने केला बलात्कार : पोलीस सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३५ वर्षीय महिला भिवंडी परिसरात राहून याच भागात ती व्यवसाय करते. तर तिची १६ वर्षीय पीडित नातेवाईकासोबत राहात आहे. विशेष म्हणजे, आरोपी हा पीडित मुलीचा नातेवाईक असल्यानं त्यांची ओळख होती. तर ६० वर्षीय नराधमाचे या प्रकरणातील आरोपी २५ वर्षीय महिलेशी प्रेमसंबंध असून तिचे दोन ते तीन विवाह झालेत. ती पतीपासून विभक्त राहात आहे. त्यातच जून महिन्यात पीडित मुलगी आरोपी महिलेच्या घरी भाजी देण्यासाठी गेली होती. त्यावेळी आधीपासूनच घरात आरोपी होता. मुलगी एकटीच घरात आल्याचा फायदा घेत प्रेयसीनं पीडित मुलीला पकडलं तर ६० वर्षीय आरोपी प्रियकरानं पीडित मुलीवर बलात्कार केला.
बलात्काराचं मोबाईलमध्ये चित्रिकरण : या घटनेमुळं पीडित मुलगी भयभीत झाल्यानं तिनं बदनामीच्या भीतीनं घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. त्यानंतर दोन्ही आरोपींनी पीडितेला २ जून आणि ५ जून रोजी रिक्षातून आरोपी महिलेच्या खोलीवर नेऊन तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. खळबळजनक बाब म्हणजे, आरोपी महिलेने दोन्हीवेळी बलात्कार करतानाचं मोबाईल कॅमेऱ्यात चित्रिकरण केलं होतं. यानंतर हा प्रकार कुठं सांगितल्यास तुला ठार मारून हे व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी दोन्ही आरोपी पीडित मुलीला देत होते.
'या' कलमांनुसार गुन्हा दाखल : पीडित मुलगी या घटनेमुळं घाबरून राहात असल्याचं तिच्या मामीच्या लक्षात आल्यानं तिच्याकडे अधिक चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर ३० जुलै रोजी पीडितेला घेऊन तिच्या मामीने शांतीनगर पोलीस ठाणे गाठत तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर भादंवि कलम ३७६, (२), (जे), ३७६, (२), (एन ), ३६६ (ए), ३४१, ५०६, ३४, सह पोक्सोचे ४, ८, १०, १२, तसंच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००चे कलम ६७, ६७ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला.
आरोपीला काही तासातच अटक : या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता पोलिसांनी घटनेचं गांभीर्य पाहून आरोपीला काही तासातच अटक केली; मात्र या गुन्ह्यातील आरोपी प्रियकराला मदत करणारी आरोपी महिला फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. तसंच ३१ जुलै रोजी अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केलं असता ३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
हेही वाचा :
- 5 वर्षीय चिमुरडीवर 75 वर्षीय नराधमाचा अत्याचार; दोषीला 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा - Thane rape case verdict
- नववीत शिकणाऱ्या मुलीला लॉजवर नेऊन अत्याचार, पीडितेच्या कुटुंबीयांना आरोपीकडून धमक्या - Minor Girl Rape Case Beed
- चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून खून, शेजारी राहणाऱ्या नराधमाला अटक - Bhiwandi Rape News