अमरावती Houj Katora Amravati : इसवी सन 1490 ते इसवी सन 1572 पर्यंत पश्चिम विदर्भात इमादशाही राजवट होती. यात अमरावती जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर असणाऱ्या अचलपूरपासून काही अंतरावर इराणी शैलीची छाप असणारी अष्टकोणी आकारात तीन मजली इमारत आहे. मागील सव्वा पाचशे वर्षांपासून ही इमारत उभी आहे.
'हौज कटोरा' उभारण्याचा उद्देश? : तलावाच्या अगदी मधात असणारी ही इमारत 'हौज कटोरा' (Houj Katora) या नावानं ओळखली जाते. अचलपूरच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक असणारा हा 'हौज कटोरा' आता भगनावस्थेत असून हा 'हौज कटोरा' उभारण्या मागचा नेमका काय उद्देश असावा यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने माहिती घेण्याचा प्रयत्न केलाय. इमादशाहीच्या काळात 'हौज कटोरा' हे प्रमुख पर्यटन केंद्र असल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे इमादशाही, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाहीतील अनेक राजांशी संबंध आल्यानं त्यांनी 'हौज कटोरा' या पर्यटन स्थळाला भेट दिल्याची माहिती, इमादशाहीवर संशोधनात्मक अभ्यास करणारे प्रा. डॉ. वैभव म्हस्के यांनी दिली.
कधीही ढासळू शकते ऐतिहासिक इमारत : इमादशाहीच्या इतिहासाची साक्ष देणारा आणि अचलपूरचे वैभव असणारा हौज कटोराची अवस्था आता अतिशय खराब झाली आहे. अनेक ठिकाणी या इमारतीला भेगा पडल्या असून काही ठिकाणी तर इमारतीचे दगड खाली पडले आहेत. ही इमारत कधीही कोसळेल अशी तिची अवस्था झाली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने अतिशय महत्त्वाची असणारी ही वास्तू सुरक्षित रहावी आणि भविष्यात अनेक काळापर्यंत टिकावी यासाठी योग्य आणि महत्त्वपूर्ण प्रयत्न करावे अशी अपेक्षा इतिहासाचे अभ्यास प्रा. डॉ. वैभव मस्के यांनी व्यक्त केली.
हौज कटोरा हे नौका विहार केंद्र : 1490 मध्ये बांधकाम सुरू झाल्यावर 1510 मध्ये 'हौज कटोरा' ही वास्तू पूर्णत्वास आली. तीन मजली असणारा 'हौज कटोरा' हा एका तलावात निर्माण करण्यात आला. याचं खास वैशिष्ट्य म्हणजे तीन मजली असणार्या या वास्तूत पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या नाहीत. मात्र दुसऱ्या मजल्यावरून तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. तलावामध्ये उभारण्यात आलेल्या 'हौज कटोरा' या ठिकाणी पहिल्या मजल्यापर्यंत पाणी राहत असल्यामुळं नौकेमध्ये बसून या इमारती जवळ आल्यावर थेट दुसऱ्या मजल्यावर चढता येत होते. यामुळं कदाचित पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यापर्यंत पायऱ्या बांधण्यात आल्या नसाव्यात. त्या काळात खास नौकायान केंद्र म्हणून 'हौज कटोरा' हा केवळ पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर दक्षिण भारतात दूरपर्यंत प्रसिद्ध होता असं, डॉ. वैभव म्हस्के यांनी सांगितलं.
फतेउल्लाह इमादशहाच्या काळातील हौज कटोरा : दक्षिण भारतात इसवी सन 1347 मध्ये कर्नाटक मध्ये बिदर आणि गुलबर्गा या ठिकाणी बहामनी राजवट उदयास आली. 1347 ते 1490 या काळात बहामनी राजवट अतिशय मजबूत अवस्थेत होती. मात्र, बाहमनी साम्राज्याचा प्रमुख सुलतान महंमद याने 5 एप्रिल 1481 मध्ये त्यांचा कर्तबगार वजीर महमूद गव्हाण याची हत्या केली. यामुळं 1490 मध्ये या राजवटीची पाच शकले उडाली. ज्यामध्ये बिजापूरची आदिलशाही, गोळकुंडाची कुतूबशाही, अहमदनगरची निजामशाही, वऱ्हाडामध्ये फतेऊल्ला इमादशहा याची इमादशाही आणि पाचवी बरीदशाही. यापैकी इमादशाहीचे मुख्य केंद्र हे चिखलदरा येथील गाविलगड किल्ला आणि अचलपूर हे होतं. गाविलगड, नरनाळा आणि बाळापूर पर्यंत इमादशाहीचं वर्चस्व होतं. 1490 ते 1572 पर्यंत फतेऊल्ला इमादशहा, इस्माईल इमादशहा, दर्याय इमादशहा, बुरहान इमादशहा आणि तुफाल खान असे पाच राजे इमादशाहीमध्ये होऊन गेलेत. इमादशाहीतील पहिलाच बादशहा फतेउल्ला खान याने 'हौज कटोरा' अचलपूरमध्ये उभारला. विशेष म्हणजे फतेउल्ला इमादशहा हा जन्मतः हिंदू होता. विजय नगरच्या युद्धात मात्र बहामनी सरदारांनी त्याला पकडलं. यानंतर त्याने धर्मांतर केलं. त्याची कर्तबदारी पाहून बहामनी बादशहा महंमद सुलतान याने त्याच्यावर वऱ्हाडची जबाबदारी सोपवली.
इमादशाहीतील पर्यटन केंद्र : इमादशाहीची स्थापना करणारा फतेउल्ला खान हा इराणमधून भारतात आलेल्या बहामनी राजवटीत सरदार असताना, बहामनी साम्राज्यातील इराणी शैलीत उभारलेल्या वास्तूंच्या फार प्रेमात पडला. यामुळंच 'हौज कटोरा' या इमारतीवर इराणी शैलीची छाप दिसते. पुढे इमादशाहीचे वैवाहिक संबंध हे निजामशाही, कुतुबशाही आदिलशाही यांच्यासोबत जुळले गेले. यामुळं या सर्व राजवटीतील बादशहा, सरदार अचलपूरला आलेत. त्यांना पर्यटनासाठी खास 'हौज कटोरा' या ठिकाणी आणल्या जायचे. यामुळंच इमादशाहीच्या काळात 'हौज कटोरा' हे अतिशय प्रसिद्ध असे पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास आले होते.
हेही वाचा -