सातारा Koyna Dam Rain Updates : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळं दुपारी बारा वाजताच्या दरम्यान धरणातून 42 हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. धरणाच्या सांडव्यावरुन 30,000 आणि पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक्स, असं एकूण 32,100 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.
कोयना, कृष्णा नदीकाठी पुराचा धोका वाढला : मुसळधार पाऊस आणि धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळं कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून कोयना तसंच कृष्णा नदीकाठी पूरस्थिती निर्माण होऊ लागली आहे. कोयना धरणातील पाणीसाठा 81.19 टीएमसी झालाय. तर धरणात प्रतिसेकंद 78 हजार क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. गेल्या चोवीस तासात कोयनानगर इथं 198 मिलीमीटर, नवजा इथं 172 आणि महाबळेश्वर इथं विक्रमी 267 मिलीमीटर पावसाची नोंद झालीय.
भूस्खलनग्रस्त भागाची प्रशासनाकडून पाहणी : पाटण तालुक्यातील मिरगाव इथं 2021 मध्ये भूस्खलन झालं होतं. त्याठिकाणी तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांनी गुरूवारी रात्री अचानक पाहणी केली. भूस्खलनग्रस्तांचं तात्पुरतं पुनर्वसन कोयनानगर इथल्या 150 निवारा शेडमध्ये करण्यात आलं. त्या ठिकाणी भूस्खलन बाधित कुटुंबं राहतात. यावेळी सुस्थितीत नसलेल्या घरात काही कुटुंबं राहत नाहीत ना? याची खात्री अधिकाऱ्यांनी केली.
पडझडीच्या घटना वाढल्या : पाऊस आणि धरणांमधून पाणी सोडण्यात आल्यानं अनेक साकव, पूल पाण्याखाली गेलेत. त्यामुळं वाहतूक ठप्प झाल्याचं बघायला मिळतंय. आता पडझडीच्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. तसंच अजिंक्यतारा किल्ल्याच्या मार्गावर झाड विद्युत तारांवर पडल्यानं सातारा शहराच्या काही भागात वीजपुरवठा खंडित झालाय. तर जावळी तालुक्यातील आलेवाडी घाटात मोठी दरड कोसळल्यानं वाहतूक बंद झाली आहे.
हेही वाचा -