नाशिक Accident On Mumbai Agra Highway : नाशिककडून आडगावकडं कोंबड खत वाहतूक करणारा भरधाव आयशर ट्रक दुभाजक तोडून कारवर आदळल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील तब्बल चारजण जागीच ठार झाल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना मुंबई आग्रा महामार्गावर सटाणा जवळील अडगाव परिसरात शुक्रवारी रात्री उशीरा घडली. भरधाव ट्रकचा एक टायर फुटल्यानं हा ट्रक दुभाजक तोडून थेट विरुद्ध बाजुच्या नाशिक लेनवर जाऊन धावत्या ब्रेजा कारवर आदळला. हा अपघात इतका भीषण होता की यात कारचा चक्काचूर होऊन चौघं जागीच ठार झाले. सीज्जू पठाण, अक्षय जाधव, रहेमान सुलेमान तांबोळी आणि अरबाज चांदुभाई तांबोळी अशी या अपघातात ठार झालेल्या नागरिकांची नावं आहेत. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
भरधाव ट्रक दुभाजक तोडून आदळला कारवर : मिळलेल्या माहिती नुसार मुंबई-आग्रा महामार्गावरुन सटाणा इथून नाशिककडं कार येत होती. यावेळी विरुद्ध दिशेनं जाणाऱ्या आयशर ट्रकचा टायर फुटल्यानं हा ट्रक थेट दुभाजक तोडून धावत्या ब्रेजा गाडीवर जाऊन आदळला. या भीषण अपघातात ब्रेजा कार चक्काचूर झाली आहे. या कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातातील मृतदेह बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाची मदत मागवण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी कारचा पत्रा कापून मृतदेह काढण्यात आले. या अपघातात सीज्जू पठाण (38, रा. इंदिरानगर), अक्षय जाधव (24, रा. श्रध्दा विहार, इंदिरानगर) रहेमान सुलेमान तांबोळी (48) त्यांचा भाचा अरबाज चांदुभाई तांबोळी (21, दोघं. रा. लेखनगर सिडको) या चौघांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहीती आडगाव पोलिसांनी दिली.
भाजीपाला व्यवसायिक असल्याची माहिती : कारमधील सगळ्यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय असल्यानं हे सगळे जण देवळा तालुक्यातील सटाणा इथं गेले होते. तिथून व्यवसाय आटोपून घराकडं नाशिकच्या दिशेनं परतत येताना ही दुर्दैवी दुर्घटना घडली. मृत अरबाजचा महिनाभरापूर्वीच साखरपुडा झाला होता. अरबाज याच्या पश्चात आई, वडील, 2 भाऊ, भावजय असा परिवार आहे. या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच शासकीय जिल्हा रुग्णालयात नातेवाईक, मित्र परिवारानं मोठी गर्दी केली. रहेमान तांबोळी यांनी पंधरवड्यापूर्वी ठाणे इथून जुनी कार खरेदी केली होती.
हेही वाचा :